पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी अचानकपणे महाराष्ट्रातील भाजप खासदारांना बैठकीसाठी स्वत:च्या निवासस्थानी बोलावून घेतले. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी तयारी सुरू केल्याची चर्चा रंगली आहे. पंतप्रधानांच्या ७ लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी या बैठकीला सकाळी ८.३० वाजता सुरूवात झाली. ही बैठक आयोजित करण्यामागचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि रखडलेल्या प्रकल्पांचा मोदींकडून आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. या मुद्द्यांवर मोदी भाजप खासदारांची मते जाणून घेतील व त्यानुसार भविष्यातील महाराष्ट्रासाठीची रणनीती ठरवतील, असा अंदाज आहे.

गेल्या तीन दिवसांत नरेंद्र मोदी यांनी अशाचप्रकारे उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील भाजप खासदारांची बैठक घेतली होती. उत्तर प्रदेशचा विचार केल्यास या बैठकीमागे नव्या सत्तेची घडी बसवण्यासाठी चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. तर गुजरातमध्येही यावर्षीच्या अखेरीस निवडणुका असल्यामुळे त्यासंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता आहे. मात्र, महाराष्ट्रात सध्याच्या घडीला असे कोणतेच राजकीय किंवा सामाजिक कारण नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी ही बैठक अचानकपणे का बोलावली याबद्दल राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कही लढवले जात आहेत.