भारत पाकिस्तानमधील परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा करून थेटपणे घेतला होता आणि परराष्ट्र सचिवांसह इतर अधिकाऱयांना त्याबद्दल काहीही माहिती नव्हते, अशी माहिती आता पुढे आली आहे.
सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास त्यांनी हा निर्णय घेतला. त्यानंतर परराष्ट्र सचिव सुजाता सिंग यांना सुरुवातीला या निर्णयाची माहिती देण्यात आली. त्यांनी लगेचच पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना या निर्णयाची माहिती दिली. बासित यांनी हुर्रियतचे नेते शाबिर शहा यांच्याशी चर्चा केल्यास परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा रद्द केली जाईल, अशा इशारा सुरुवातीला त्यांना देण्यात आला. मात्र, बासित यांनी हुर्रियतच्या नेत्यांची भेट घेतल्यानंतर संध्याकाळी पाचच्या सुमारास सुषमा स्वराज यांनी मोदींशी चर्चा केली आणि त्यानंतर सचिव स्तरावरील चर्चा रद्द करण्याची घोषणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सुजाता सिंग यांनी चर्चा रद्द करण्यात आल्याची माहिती बासित यांना दिली नाही आणि परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी थेटपणे पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहीर केला.