सोशल मीडियावर काहीही पोस्ट केले तरी खपून जाते, अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. सोशल मीडियाचा वापर करताना अतिशय काळजी घ्यावी लागते. कारण सोशल मीडियावरील अनेकजण अतिशय काळजीपूर्वक सर्व गोष्टींवर लक्ष ठेवत असतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने चुकीचे ट्विट, चुकीचा फोटो पोस्ट केल्यास संबंधित व्यक्तीला ‘लक्ष्य’ केले जाऊ शकते. केंद्रीय ऊर्जामंत्री पियूष गोयल यांना या गोष्टीचा नुकताच अनुभव आला. त्यामुळे ‘चलता है’ असे म्हणत कोणी चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला, तरी सोशल मीडियाकडून त्या व्यक्तीला त्याची चूक लक्षात आणून दिली जाते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.

केंद्रीय उर्जामंत्री पियूष गोयल यांनी केंद्र सरकारच्या योजनेच्या यशाची माहिती देण्यासाठी एक ट्विट केले होते. ‘सरकारच्या योजनेमुळे देशातील सुमारे ५० हजार किलोमीटर रस्त्यांवर एलईडी लाईट्स लावण्यात आल्या. सरकारच्या योजनेला यश मिळाल्याने देशातील रस्ते उजळून निघाले,’ असे ट्विट करत गोयल यांनी योजनेचे प्रमोशन केले. गोयल यांच्या ट्विटवर कोणीही आक्षेप घेतला नाही. मात्र या ट्विटसोबत गोयल यांनी पोस्ट केलेल्या फोटोवर सोशल मीडियावरील अनेकांनी जोरदार आक्षेप घेतला. ‘देशातील अनेक रस्ते एलईडीमुळे उजळून निघाले,’ असे म्हणत गोयल यांनी एका रस्त्याचा फोटो ट्विटसोबत पोस्ट केला होता. मात्र हा फोटो भारतातील नव्हे, तर रशियातील एका रस्त्याचा होता.

पियूष गोयल यांच्या ‘एलईडी’बद्दलच्या चुकीच्या फोटोवर सोशल मीडियाने ‘प्रकाश’ टाकला. ट्विटरवरील अनेकांनी गोयल यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली. अखेर गोयल यांनी त्यांचे डिलीट केले. यानंतर गोयल यांनी एक ट्विट करत सोशल मीडियाच्या सामर्थ्यावर भाष्य केले. ‘तथ्य लक्षात आणून देण्यात, त्यावर प्रकाश टाकण्यात सोशल मीडियाची मदत होते,’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले. याआधीही अनेकदा भाजपकडून सोशल मीडियावर चुकीचे फोटो वापरण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी २००२ च्या गुजरात दंगलीतील छायाचित्र पोस्ट करत पश्चिम बंगालमध्ये दंगल उसळल्याचे म्हटले होते.