कर्नाटकामध्ये राष्ट्रीय स्वंयसेवक संघासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रविवारी (दि. २३) राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या एका नेत्याने आणि पेजावर मठाच्या स्वामींनी उडपी येथील कृष्ण मंदिराची स्वच्छता अभियान राबवले आहे. परंतु दलितांनी येथे मोर्चा काढल्यानेच संघाने शुद्धिकरण केल्याचा आरोप दलित संघटनांनी केला आहे.
दि. ९ ऑक्टोबर रोजी दलितांनी उडपी मंदिरात बरोबरीचा अधिकार मिळावा म्हणून ‘उडपी चलो’ मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात बेंगळुरू ते उडपीपर्यंत हजारो दलितांनी सहभाग नोंदवला होता. त्यानंतर संघाचे कार्यकर्ते आणि युवा ब्रिगेडचे प्रमुख चक्रवर्ती सुलिबेले यांनी मंदिर आणि उडपी शहरातील प्रमुख मार्गावर स्वच्छता अभियानाचे आयोजन केले होते.
नऊ ऑक्टोबरला झालेल्या दलित मोर्चानंतर लगेच युवा ब्रिगेडने संपूर्ण उडपी शहरातील रस्ते साफ केले होते. याला प्रत्युत्तर देण्यासाठी काही दलित संघटनांनी २३ ऑक्टोबरला आणखी एका मोर्चाचे आयोजन करण्याचे ठरवले होते. तसेच युवा ब्रिगेडवर बंदीची मागणी केली होती. परंतु पोलीस अधिक्षक के.टी. बाळकृष्णा यांनी त्यांच्या दोन्ही मागण्या फेटाळल्या होत्या. त्यामुळे दलित संघटनांना आपला मोर्चा रद्द करावा लागला होता. तर दुसरीकडे संघाच्या कार्यकर्त्यांनी २३ ऑक्टोबर रोजी मंदिराच्या साफसफाईचे आयोजन केले होते. सुमारे ५०० कार्यकर्त्यांनी मंदिराचे शौचालय, पार्किंग, स्वयंपाकघर आणि परिसर स्वच्छ केले होते.
नऊ ऑक्टोबरच्या ‘उडपी चलो’ मोर्चात गुजरातचे दलित नेता जिग्नेश मवानी हेही सहभागी झाले होते. मेवानी यांनी मोर्चाच्या समारोपप्रसंगी उडपी मंदिरात ‘भेडा प्रथा’ (जाती आधारित जेवण्यास बसण्याची व्यवस्था) आणि गो संरक्षणाच्या नावावर होणाऱ्या हिंसेवर बंदीची मागणी केली होती. या गोष्टी बंद न केल्यास आम्ही तुरूंगात जाण्यासही तयार असल्याचे मेवानी यांनी म्हटले होते. याच रॅलीत गुजरातहून आलेल्या वकिलांनी जमीन वाटपात सरकार भेदभाव करत असल्याचा आरोप केला होता.
मंदिरात स्वच्छता अभियान राबवले होते. तो दलितविरोधी शुद्धिकरण कार्यक्रम नव्हता असे स्पष्टीकरण संघाचे कार्यकर्ते सुलिबेले यांनी दिले होते. दलितांनी काढलेल्या उडपी चलो मोर्चा दरम्यान उडपी मठ आणि मंदिराबाबत चुकीचा संदेश दिल्याचा आरोप ही सुलिबेले यांनी केला. जर मंदिरात केलेले स्वच्छता अभियान त्यांच्या विरोधात होते असे वाटत असेल तर आम्ही काहीच करू शकत नाही अशी पुस्तीही त्यांनी जोडली. दलित संघटनांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या या स्वच्छता अभियानावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.