सामूहिक बलात्काराच्या घटनेतील मुलीवर आतडय़ाच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया मोफत करून देण्याचा प्रस्ताव सर गंगाराम या खासगी रुग्णालयाने मांडला आहे. या बलात्कारित मुलीच्या आतडय़ात जखमांमुळे संसर्ग झाला आहे.
सर गंगाराम हॉस्पिटलने हा प्रस्ताव ही मुलगी दाखल असलेल्या सफदरजंग रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. डी. नाथानी यांना दिल्याचे रुग्णालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ.आर. एस. राणा यांनी सांगितले.
या मुलीच्या आतडय़ाला गँगरिन झाल्याने ते डॉक्टरांनी काढले आहे. आतडे काढल्यावर आतडय़ाचे कार्य सुरळीत करण्यासाठी आतडय़ाचे प्रत्यारोपण गरजेचे असते असे गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजीतील शल्यविशारद डॉ. समीरण नंदी यांनी सांगितले.
सर गंगाराम रुग्णालयात भारतातील पहिली आतडे रोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती व त्यात एका जिवंत दात्याच्या आतडय़ाचा भाग वापरला होता. या रुग्णालयाचे प्रत्यारोपण विशारद डॉ. नैमिष मेहता यांनी ही शस्त्रक्रिया केली होती. एकतर मेंदू निकामी झालेल्या रुग्णाचे आतडे घेणे किंवा जिवंत व्यक्तीच्या आतडय़ाचा भाग त्या व्यक्तीने दान केल्यास वापरणे हे दोन पर्याय यात उपलब्ध आहेत.    
आतडय़ाचे प्रत्यारोपण
डॉ. नैमिष मेहता मानवात लहान आतडय़ाची लांबी ६०० से.मी असते. त्यातील २०० से.मी. भाग कापून दुसऱ्या व्यक्तीमध्ये प्रत्यारोपित करता येतो. मेंदू निकामी झालेल्या रुग्णाचे मात्र पूर्ण आतडे वापरता येते. जेव्हा आतडय़ाचा काही भाग निकामी होतो व काढून टाकला जातो तेव्हा शिरेतून वेगळ्या स्वरूपात पोषण द्यावे लागते. त्यात कॅथेटरचा वापर केला जातो व ती कालांतराने जंतूसंसर्गित होऊन जिवाला धोका निर्माण होतो. यकृतही खराब होते. त्यामुळे यकृत खराब होण्याच्या अगोदरच आतडय़ाचे प्रत्यारोपण करावे लागते.