• वर्तमानपत्रांच्या वाचकांना त्यांचे नाव फारसे माहीत नव्हते किंवा टीव्हीच्या प्रेक्षकांना त्यांचा चेहरा फारसा परिचित नव्हता. मात्र आतापर्यंतच्या अप्रसिद्ध इतिहासातून बाहेर पडून शांत स्वभावाचे रामनाथ कोविंद गुरुवारी यांची नवनिर्वाचित राष्ट्रपती म्हणून इतिहासात नोंद झाली.
  • साधेसुधे, निगर्वी आणि मनमिळाऊ असे वर्णन करण्यात आलेले बिहारचे माजी राज्यपाल आणि भाजपचे अतिशय जुने कार्यकर्ते असलेले रामनाथ कोविंद यांची गुरुवारी ६५ टक्के मते मिळवून देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर निवड झाली.
  • ७१ वर्षे वयाचे कोविंद हे राष्ट्रपती भवनात निवडून जाणारे भाजपचे पहिलेच सदस्य आणि आजवरचे दुसरे दलित नेते आहेत. निवडीची घोषणा झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील कानपूर देहातच्या पराउंख खेडय़ातील त्यांच्या वडिलोपार्जित घरी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
  • काही दिवसांपूर्वीपर्यंत पाटण्याच्या राजभवनात असताना कोविंद यांचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी सौहार्दाचे संबंध होते. भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने त्यांची राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून निवड केली. त्यामुळे शांततेतून बाहेर पडून यानंतर ते देशाचे पहिले नागरिक म्हणून मिळणाऱ्या प्रकाशझोतात येणार आहेत.
  • वाणिज्य विषयाचे पदवीधर असलेले कोविंद यांनी कानपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. १९८० ते १९९३ या कालावधीत ते सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारचे वकील होते. ते विवाहित असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी अपत्ये आहेत. त्यांची पत्नी सविता ही प्रचारादरम्यान त्यांच्यासोबत होती. मात्र त्यांच्या मुलांबाबत कुणाला फारशी माहिती नाही.