अहमदाबाद येथील गाजलेल्या प्रदीप ‘डॉन’ हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला दोषी जिग्नेश सोनी याने कारागृहातील मुस्लिम कैद्यांकडून छळ होत असल्याचा आरोप करत आपल्याला मुस्लिम धर्मात धर्मांतर करण्याची परवानगी देण्याची मागणी गुजरात पोलिसांशी पत्रव्यवहार करुन केली आहे. येथील साबरमती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या जिग्नेशला अलिकडेच वेगळ्या कोठडीत हलवण्यात आले आहे. केवळ हिंदू कैद्यांचा छळ करण्याच्या उद्देशानेच त्यांना सर्वाधिक मुसलमान कैदी असलेल्या कोठडीत हलवण्यात येते, असा आरोप त्याने केला आहे. मात्र कारागृह प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
कारागृह अधीक्षक आर.एस.भगोरा यांना २७ मे रोजी लिहिलेल्या पत्रात आपल्याला इस्लाम धर्मात धर्मांतर करण्याची परवानगी देण्यात यावी तसेच येणा-या काळात आपण अन्य दहा कैद्यांना असा अर्ज करण्यास भाग पाडणार असल्याचे त्याने लिहिले आहे. जिग्नेशचा हा अर्ज गुजरात उच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे.
जिग्नेशने कारागृह प्रशासनाला दिलेल्या अर्जात आपल्याला २२ मे रोजी अन्य कोठडीत हलविण्यात आल्याचे नमुद केले आहे. या कोठडीत मुसलमान कैद्यांची संख्या जास्त आहे. आपल्याल त्रास देण्यासाठीच अल्पसंख्याक कैद्यांबरोबर ठेवण्यात आले असून हिंदू कैद्यांची छळवणूक करण्याच्या उद्देशानेच कारागृह प्रशासनाकडून या कोठडीचा वापर केला जातो, असा आरोप त्याने केला आहे.
दरम्यान साबरमती कारागृह प्रशासनाने जिग्नेशचा हा अर्ज म्हणजे कारागृह प्रशासनावर दबाव आणण्याची खेळी असल्याचे सांगितले आहे. जिग्नेश हा अत्यंत हट्टी स्वभावाचा कैदी असून त्याच्यावर खंडणीचे आणि धमकीचे गुन्हे दाखल आहेत. त्याने कारागृहातील चार ते पाच कैद्यांच्या साथीने एक टोळी तयार केली होती आणि त्याला त्यांच्याचबरोबरच राहायचे होते. ही गोष्ट कारागृहातील सुरुक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरली असती यामुळेच त्याला आणि त्याच्या अन्य चार सहका-यांना वेगवेगळ्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. तसेच मुसलमान कैद्यांकडून धर्मांतरासाठी जबरदस्ती करण्यात येत असेल तर त्याने जरुर तक्रार करावी त्यांची नक्कीच दखल घेतली जाईल. सध्यातरी अशी कोणतीही परीस्थिती नसून केवळ मुसलमान कैद्यांबरोबर ठेवले म्हणून अशाप्रकारचे अर्ज करुन कारागृह प्रशासनावर दबाव आणणे अत्यंत चुकीचे असल्याचे साबरमती कारागृहाचे अधीक्षक आर. एस. भगोरा यांनी सांगितले.