दंगलग्रस्त सहारणपूर शहरातील संचारबंदी गुरुवारी सहा तासांसाठी उठविण्यात आली. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत संचारबंदी उठवल्यानंतर विविध समुदायांतील लोकांच्या वतीने शांतता फेरी काढण्यात आल्याची माहिती सहारणपूर जिल्हा दंडाधिकारी संध्या तिवारी यांनी दिली.
संचारबंदी उठवल्यानंतरही शहरातील काही दुकानदारांनी दुकाने उघडलेली नव्हती. संचारबंदीमुळे व्यवसायाचे मोठे नुकसान झाले असून संचारबंदीचा निषेध म्हणून आम्ही दुकाने उघडली नाहीत, असे एका व्यापाऱ्याने या वेळी सांगितले.
दरम्यान, विविध धर्माच्या लोकांनी पालिका प्रशासनाने आयोजित केलेल्या शांतता मोर्चात सहभाग घेतला आणि शहरात एकता आणि बंधुता टिकवण्यासाठी सर्वानी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. या वेळी जिल्हा दंडाधिकारी, पोलीस अधीक्षक राजेश कुमार पांडे आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
संध्या तिवारी यांनी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
कडक बंदोबस्त
संचारबंदी उठवल्यानंतर बँका आणि कारखाने उघडण्यात आले. शहराभोवती पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. दंगलीस कारणीभूत ठरलेल्या प्रमुख सूत्रधारासह सहा जणांना बुधवारी पोलिसांनी अटक केली. यात माजी नगरसेवक मोहर्रम अली पप्पू याचा समावेश आहे. याशिवाय मोहम्मद इर्शाद, दानिश, मोहम्मद अबिद, मोहम्मद साहीद आणि हाजी मोहम्मद इरफान यांचा समावेश असल्याचे पोलीस अधीक्षक पांडे यांनी सांगितले. गेल्या शनिवारी संचारबंदी लागू केली होती.