काँग्रेसच्या आठ आमदारांविरुद्ध समाजवादी उमेदवार; आता काँग्रेसला ८०-८५ जागा देण्याची तयारी

समाजवादी पक्षाने शुक्रवारी १९१ उमेदवारांची यादी परस्परच जाहीर केल्याने काँग्रेसबरोबरील आघाडीला अंतिम आकार येण्यापूर्वीच काही प्रमाणात तडे गेले. त्यातच काँग्रेसचे आमदार असणाऱ्या आठ जागांवरही समाजवादी पक्षाने उमेदवार दिल्याने काँग्रेसमध्ये चलबिचल सुरू झाल्याचे समजते.

शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री अखिलेशसिंह यादव यांच्यावतीने राष्ट्रीय उपाध्यक्ष यांनी १९१ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्याचे पडसाद उमटत असतानाच काँग्रेसला ८०-८५ जागा देण्याची भाषा नंदांनी केली. गुरुवारी याच नंदा यांनी काँग्रेसला शंभरपेक्षा अधिक जागा देण्याचे मान्य केले होते. समाजवादी पक्षाने अचानक ‘यू टर्न’ घेतल्याने काँग्रेसच्या वर्तुळात नाराजीचा सूर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज (शनिवार) किंवा उद्या (रविवार) आघाडीची घोषणा अपेक्षित आहे. तेव्हा चित्र आणखी स्पष्ट होईल.

मथुरा, बिलासपूर, किडवाईनगर, श्यामली यांच्यासह काँग्रेस आमदार असणाऱ्या आठ मतदारसंघात उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते असलेले प्रदीप माथूर यांच्या मथुरेमध्ये अशोक आगरवाल यांना, तर काँग्रेसचे राष्ट्रीय चिटणीस असणाऱ्या आमदार संजय कपूर यांच्या बिलासपूरमध्ये समाजवादी पक्षाने बीना भारद्वाज यांना उमेदवारी दिली. मुस्लीमबहुल देवबंदमध्ये तर काँग्रेस आजी आमदार माविया अली यांनाच समाजवादी पक्षाचे तिकीट देण्याचा चमत्कार केला. एकीकडे काँग्रेसशी वाटाघाटी चालू असतानाच दुसरीकडे काँग्रेसच्या जागांवर उमेदवार जाहीर करण्याबाबत नंदा म्हणाले, ‘आघाडी अजून अंतिम नाही. एकदा जागावाटप झाले, की त्यानुसार आमचे उमेदवार माघार घेतील.’

२०१२च्या निवडणुकीत पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकांची मते मिळालेल्या जागाच काँग्रेसला दिल्या जातील, अशी मखलाशी नंदा यांनी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, अशा फक्त ५४ जागा आहेत. अमेठी मतदारसंघात समाजवादी पक्षाचाच उमेदवार उभा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अमेठी हा जरी गांधी घराण्याचा पारंपरिक लोकसभा मतदारसंघ असला, तरी सध्या तेथील स्थानिक आमदार गायत्री प्रजापती समाजवादी पक्षाचे आहेत.