सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अभिनेता शाहरुख खानला ‘रेड चिलीज’ कंपनीच्या शेअर व्यवहारावरुन २३ ऑगस्टला ‘ईडी’च्या कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावली होती. परकीय चलन कायद्याचे उल्लंघन (FEMA) केल्याप्रकरणी चौकशीस सामोरे जाण्याची तयारी दाखवत ईडीसमोर हजर राहण्यासाठी शाहरुखने चार आठवड्यांची मुदत मागितली होती. ईडीने ही मुदवाढ दिल्यानंतरही शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी आज चौकशीसाठी गैरहजर राहिले.

नाइट रायडर्स स्पोर्ट्स कंपनीने २००८-०९ मध्ये काही शेअर विकले होते. हे शेअर जुही चावलाचे पती जय मेहता यांच्या मॉरिशसमधील कंपनीला विकण्यात आले होते. या संपूर्ण व्यवहाराची ईडी चौकशी करत आहे. शेअर मुद्दाम कमी किंमतीला विकून ७३.६ कोटींचा तोटा झाल्याचे दाखवण्यात आल्याचा संशय ईडीने व्यक्त केला. या प्रकरणी सुरुवातीला शाहरुख व त्याची पत्नी गौरी खान यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

काय आहे प्रकरण?

२००८ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स स्पोर्टस् प्रा. लि. आणि जय मेहता यांच्या मालकीची ‘सी आईसलँड इन्व्हेस्टमेंट’ या कंपन्यांमध्ये शेअर खरेदी-विक्री व्यवहार झाला होता. त्यावेळी केकेआरने ६०-७० रुपयांचे शेअर जय मेहतांना अवघ्या ६ ते ७ रुपयांना विकले होते. हे शेअर्स विकताना प्रत्येक शेअरची किंमत आठ ते नऊपटीने कमी करण्यात आली होती. या प्रकरणी ७३.६ कोटींच्या व्यवहारात शाहरुखने परकीय चलन नियमांचा भंग केल्याचे ईडीने केलेल्या मूल्यांकन अहवालात स्पष्ट झाले. त्यामुळे या व्यवहाराबाबत आक्षेप नोंदविण्यात आला होता.