दिल्लीतील सामूहिक बलात्कारात मृत्युमुखी पडलेल्या तरुणीला न्याय मिळावा यासाठी बुधवारी जंतरमंतरवर काढलेल्या शांती मार्चला दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनीही बुधवारी हजेरी लावली. दिल्ली बलात्कारातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी जंतरमंतरवर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
दिल्ली महिला आयोगातर्फे बालभवन ते राजघाटदरम्यान महिला सुरक्षा सन्मान मार्चचे आयोजन करण्यात आले होते. या मार्चला मोठय़ा संख्येने नागरिकांनी हजेरी लावली. या वेळी स्वत: मुख्यमंत्री शीला दीक्षित हजर होत्या. बलात्काराच्या गुन्ह्य़ातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, दिल्ली बलात्काराच्या गुन्ह्य़ातील आरोपींना फाशीची शिक्षा करावी, या मागणीसाठी दोन व्यक्तींनी जंतरमंतरवर उपोषण सुरू केले आहे. या वेळी परिस्थिती चिघळू नये म्हणून मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.