माजी क्रिकेटर आणि भाजपचा माजी खासदार नवज्योत सिंग सिध्दूने काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची त्यांनी भेट घेतली आणि पक्षात प्रवेश केला. पक्षप्रवेशाचा अधिकृत सोहळा सोमवारी होणार आहे.

सिध्दूच्या  रूपाने काँग्रेसला एक स्टार प्रचारक मिळालाय. काही महिन्यांपूर्वीत त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते कोणत्या पक्षात जाणार याविषयी सगळ्यांना उत्सुकता होती पुढच्याच महिन्यात होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष होतं.

पंजाबमध्ये ११७ जागांसाठी पुढच्या महिन्यात निवडणुका होणार आहेत. ४ फेब्रुवारीला एकाच टप्प्यात ही निवडणूक पार पाडली जाणार आहे. सध्या पंजाबचमध्ये प्रकाश सिंग बादल यांच्या नेतृत्वाखाली अकाली दलाचं सरकार आहे. अकाली दलाकडे सर्वात जास्त ५४ जागा आहेत तर भाजपकडे १ जागा आहेत.

पंजाबच्या निवडणुकांच्या निमित्ताने काँग्रेस पक्ष २०१४ लोकसभा निवडणुकांनंतर कायम ढासळत आलेली आपली प्रतिमा सुधारण्याच्या मागे आहे. बादल यांच्या सरकारआधी पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष सत्तेवर होता. गेली १० वर्ष पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या शिरोमणी अकाली दलाला ‘अँटी इन्कम्बन्सी’चा फटका बसण्याती शक्यता व्यक्त करण्यात येतेय. अमरिंदर सिंग यांनीही गेले काही दिवस मीडियासमोर येत चर्चेत राहण्याचा प्रयत्न केलाय. पंजाब निवडणुकांसाठी काँग्रेस आणि आप चांगल्या तयारीने मैदानात उतरण्याची चिन्हं आहेत

सिध्दूने खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ते आम आदमी पार्टीमध्ये जाणार असाही अंदाज व्यक्त होत होता. आप आदमी पार्टीसाठीही ही निवडणूक महत्त्वाची आहे. फक्त दिल्लीपुरता मर्यादित असलेला पक्ष ही आपली प्रतिमा धुवून काढायला आप उत्सुक आहे. तसंच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनाही राष्ट्रीय पातळीवरचा नेता अशी आपली इमेज बनवायची आहे. याविषयी गेले काही दिवस आप नेही मीडियामध्ये अनेक विधानं केली आहेत. सध्यातरी आप कडे केजरीवालांचाच चेहरा आहे. आपच्या मनीष सिसोदिया यांनी पंजाबच्या जनतेला आपण केजरीवाल यांनाच मत देत असल्याचं समजत आप ला मत द्यावं असं आवाहन केलं होतं. त्यानंतर केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी प्रयत्न करकत असल्याच्या चर्चेला उधाण आल्यावर त्यांनी लगेच या वृत्ताचा इन्कार केला होता.

नवज्योत सिंग सिध्दूच्या काँग्रेसप्रवेशामुळे पंजाबमध्ये काँग्रेसला अचानक बळ मिळालंय. त्यामुळे आतापर्यंत दुरंगी वाटणाऱ्या पंजाबच्या आखाड्यात तिसरा पैलवान दाखल झालाय.