किरकोळ बाजारपेठेत अल्पावधीतच बहुराष्ट्रीय कंपन्यांना हादरा देणाऱ्या योगगुरू रामदेव बाबा यांच्या ‘पतंजली’ला टक्कर देण्यासाठी आता आणखी एक अध्यात्मिक गुरू सज्ज झाले आहेत. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर हे आयुर्वेदिक टूथपेस्ट आणि साबण विक्रीसाठी तब्बल एक हजार रिटेल स्टोअर्स सुरू करणार आहेत. तसेच रामदेव बाबा यांच्या ‘पतंजली’च्या धर्तीवर क्लिनिक आणि उपचार केंद्रेही सुरू करणार आहेत.

श्री श्री रविशंकर हे तब्बल एक हजार रिटेल स्टोअर्स सुरू करणार असल्याचे वृत्त ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिले आहे. या स्टोअर्समध्ये सुरुवातीला टूथपेस्ट, डिटर्जेंट, तूप, कुकीज विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. आयुर्वेदिक उत्पादनांचा वापर करण्याकडे लोकांचा कल अधिक वाढला आहे. सध्याच्या कंपन्यांपेक्षा आमच्या ब्रँडची उत्पादने नक्कीच उत्तम आहेत, असे श्री श्री आयर्वेद ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेज कटपिटिया यांनी सांगितले. ‘श्री श्री तत्व’ या नावाने कंपनी स्टोअर्स सुरू करणार आहे. २००३ पासून कंपनी हेल्थ ड्रिंक्स, साबण, मसाले आदी उत्पादनांची विक्री करत आहे. या उत्पादनांची अत्याधुनिक रिटेल स्टोअर्स आणि ऑनलाईन विक्री केली जात आहे. आता कंपनी विविध पदार्थ आणि गृहपयोगी उत्पादनांच्या निर्मिती क्षेत्रात विस्तार करणार आहे. ३०० हून अधिक उत्पादने बाजारपेठेत आणण्यात येणार आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.

आयुर्वेद बाजारात प्रगती करण्याचा आमचा मानस आहे. आमची कुणाशीही स्पर्धा नाही, असे कटपिटिया यांनी स्पष्ट केले. ‘श्री श्री तत्व’चे बहुतांश स्टोअर्स पतंजली स्टोअर्सच्या जवळच सुरू करण्याची शक्यता आहे. याबाबत ‘श्री श्री तत्व’ची भागिदार कंपनी असलेल्या ‘फ्रेंचाइज इंडिया होल्डिंग्ज’चे संचालक गौरव मार्या यांनी सांगितले की, “पुढील महिन्यातच पहिला स्टोअर सुरू करण्यात येईल आणि नोव्हेंबरपर्यंत ५० स्टोअर्स सुरू करण्याचे लक्ष्य आहे. पुढील काही वर्षांत यातून १ अब्ज डॉलरची उलाढाल होईल, अशी अपेक्षा आहे.”

दरम्यान, पतंजलीने अल्पावधीतच किरकोळ बाजारपेठेतील विदेशी कंपन्यांना ‘जोर का झटका’ दिला आहे. पतंजलीच्या उत्पादनांना लोकांनी पसंती दिली आहे. अनेक दिग्गज कंपन्यांना मागे टाकत पतंजलीने अल्पावधीतच बाजारपेठा आणि घराघरांमध्ये स्थान मिळवले आहे. गृहपयोगी उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या हिंदुस्तान युनिलिव्हर, डाबर यांच्यासह अनेक दिग्गज कंपन्यांनी पतंजलीमुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी नवी योजना तयार केल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी नैसर्गिक उत्पादनांवर भर देण्याचा या कंपन्यांचा मानस आहे. गृहपयोगी वस्तू निर्मिती क्षेत्रात पतंजलीकडे सध्या मोठी आघाडी आहे.