स्पेनच्या बार्सिलोनामध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी जर्मनी आणि फिनलँडमध्ये चाकू हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे दोन्ही देशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. फिनलँडच्या टुर्कू शहरात झालेल्या चाकू हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. या प्रकरणातील एका हल्लेखोराला फिनलँड पोलिसांनी अटक केली आहे. याशिवाय इतर हल्लेखोरांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. मात्र या हल्ल्यामागील उद्देशाबद्दल पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.

जर्मनीच्या वपर्टालमध्ये एका व्यक्तीची चाकू भोसकून हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यामागे नेमक्या किती व्यक्ती होत्या, याची माहिती अद्याप जर्मन पोलिसांनी दिलेली नाही. मात्र हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा हल्ल्याच्या हेतूबद्दल पोलिसांनी भाष्य केलेले नाही. याशिवाय हा हल्ला दहशतवादी हल्ला होता का, या प्रश्नाला उत्तर देणेही पोलिसांनी टाळले. बार्सिलोनातील हल्ल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी फिनलँड आणि जर्मनीत चाकू हल्ले झाले आहेत. बार्सिलोनात संशयित दहशतवाद्याने पदपथावरुन चालणाऱ्या लोकांना गाडीने चिरडले होते. यामध्ये १४ लोकांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ला असल्याची माहिती स्पॅनिश पोलिसांनी दिली.