छत्तीसगडमधील नक्षली हल्ल्यात २५ जवान शहीद झाल्याच्या घटनेनंतर नक्षली हल्ल्यांचे भीषण वास्तव मांडणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या पाच वर्षात नक्षली हल्ल्याच्या ५, ९६० घटना झाल्या असून या हल्ल्यात ४५५ जवान शहीद झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होते.

सुकमा येथे नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या तुकडीवर हल्ला केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली होती. या हल्ल्यात २५ जवान शहीद झाल्याने नक्षलवादाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘दैनिक भास्कर’ने दिलेल्या वृत्तानुसार देशभरात गेल्या पाच वर्षात नक्षलवाद्यांनी केलेल्या हिंसाचाराच्या ५,९६० घटना घडल्या आहेत. यामध्ये १,२२१ नागरिक आणि ४५५ जवानांचा मृत्यू झाला आहे. सुरक्षा दलाच्या कारवाईत मृत्यू होणाऱ्या नक्षलवाद्यांचे प्रमाण कमी आहे. गेल्या पाच वर्षात ५८१ नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे. गृहमंत्रालयातून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षात नक्षलवाद्यांनी ९१ टेलिफोन एक्सचेंजना लक्ष्य केले. याशिवाय २३ शाळांना नक्षलवाद्यांनी लक्ष्य केले होते. विशेष म्हणजे नोटाबंदीनंतर नक्षलवादी कारवायांवर वचक बसेल असा दावा पोलिसांकडून केला जात होता. या दाव्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पोलिसांच्या गुप्तचर विभागाचे अपयश हे या हल्ल्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे जाणकारांचे मत आहे. नक्षलींच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांच्या विशेष शाखेतील मोठी टीम या भागात सक्रीय असते. पण या विभागातील अनेक महत्त्वाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदली झाल्याने पोलिसांना पुरेशी माहिती मिळण्यात अपयश येत असल्याचे सूत्रांकडून समजते.

छत्तीसगडमधील आयजी एस.आर.पी कल्लूर यांची नक्षलवाद्यांमध्ये दहशत होती. बस्तर रेंजमध्ये त्यांनी दोन वर्षात नक्षलवाद्यांविरोधात मोहीम राबवली. या मोहीमेला यश आले आणि अनेक नक्षलवाद्यांनी समर्पणही केले होते. कल्लूरी हे स्वतः नक्षलवादग्रस्त भागात चालत गस्त घालत होते. पण कल्लूरी यांची बदली झाल्याने नक्षलवादी पुन्हा सक्रीय झाल्याचा दावा केला जात आहे.