सुनील भारती मित्तल यांची मागणी

‘एच-१बी’ व्हिसा धोरणाविरोधात भारताने कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. यासाठी भारतानेही फेसबुक, गुगल आणि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या कंपन्यांवर का बंदी घालू नये, असा प्रश्न भारतीय दूरसंचार कंपनी एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी उपस्थित केला आहे.

अमेरिकेच्या चुकीच्या धोरणांचा विरोध करणे आवश्यक आहे. भारतामध्ये विदेशी कंपन्या मोठय़ा प्रमाणात नफा मिळवतात. त्यामुळे भारताच्या आयटी व्यावसायिकांसाठी व्हिसा धोरण कडक करणे योग्य नाही. ज्या ठिकाणी कामगार आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती प्राप्त करून देतात तेथे भारतीय कंपन्यांना एक निश्चित पगार देण्यासाठी सक्ती केली जाते. हे अतिशय चुकीचे धोरण आहे, असे त्यांनी म्हटले.

विदेशी आयटी गुगल, फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप कंपन्यांची कोटय़वधी अ‍ॅप भारतामध्ये वापरली जातात. मात्र त्याच वेळी भारतीय कंपन्यांनी असे अनेक अ‍ॅप विकसित केली आहेत. त्यामुळे या विदेशी कंपन्यांना भारतामध्ये बंदी का घालू नये? भारतामध्ये फेसबुक २० कोटी, व्हॉट्सअ‍ॅप १५ कोटी आणि गुगल १० कोटी लोक वापरतात. भारतामध्येही त्यांच्यासारखीच अ‍ॅप निर्माण झाल्यामुळे आपण गुगल आणि फेसबुकवर का बंदी घालू नये, असे सुनील मित्तल यांनी म्हटले आहे.

भारतामध्ये ग्राहकांची संख्या मोठी असल्याने आपला देश तंत्रज्ञानावर आधारित कंपन्यांसाठी एक मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे कोणत्याही देशाने भारतासोबत भेदभाव करण्याची गरज नाही, असे भारतामध्ये मोबाइल क्रांतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सुनील भारती मित्तल यांनी म्हटले आहे. मागील काही आठवडय़ांमध्ये अमेरिका, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियाने भारतीय आयटी तंत्रज्ञांच्या विरोधात कडक व्हिसा धोरण स्वीकारले आहे.