दहशतवादाच्या मुद्द्यावर अमेरिका भारतासोबत असल्याची ग्वाही अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी दिली असतानाच भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीदेखील पाकला खडे बोल सुनावलेत. पठाणकोट हल्ला आणि मुंबई हल्ल्यातील दोषींवर कारवाई करा, मगच चर्चा शक्य असल्याचे सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे.
दोन्ही देशांतील सामरिक आणि व्यापारी क्षेत्रातील चर्चेची दुसरी फेरी मंगळवारी नवी दिल्लीत सुरू झाली. त्याला भारताच्या वतीने स्वराज, वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन तर अमेरिकेच्या वतीने केरी आणि वाणिज्यमंत्री पेनी प्रिट्झकर हे उपस्थित होते. स्वराज आणि केरी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत दोन्ही देशांची भूमिका स्पष्ट केली. ‘मी केरी यांना सीमा रेषेपलीकडून सुरु असलेल्या दहशतवादी कारवायांची माहिती दिली. कोणत्याही देशाने दहशतवादामध्ये चांगला आणि वाईट दहशतवाद अशी विभागणी न करता दहशतवादावर लगाम लावावा यावर आमचे एकमत झाले’ असे त्यांनी सांगितले. सुषमा स्वराजांनी असे सांगून पाकिस्तानला सूचक इशाराच दिला. पाकिस्तानने दहशवाताद्यांचे तळ उध्वस्त करावेत. लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणी डी कंपनी अर्थात दाऊदवरही कठोर कारवाई करावी यावरही भारत अमेरिकेचे एकमत आहे असे सुषमा स्वराज यांनी आवर्जून सांगितले. तर जॉन केरी यांनीदेखील सुषमा स्वराज यांच्या विधानाशी सहमती दर्शवली. आम्ही चांगला आणि वाईट दहशतवाद असा दुजाभाव करत नाही. दहशतवादाच्या मुद्द्यावर अमेरिका नेहमीच भारतासोबत आहे असे त्यांनी म्हटले आहे. दहशतवादाविरोधात दोन्ही देशांमधील सहकार्य वाढण्यावर आमचा भर असेल. दहशतावाद्यांविषयीची माहिती एकमेकमांना पुरवण्यास दोन्ही देश तयार असल्याचे स्वराज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.