‘पॉकेमॉन’या खेळाचे वेड दोघांच्या जीवावर बेतले. ‘पॉकेमॉन’ हा खेळ खेळत ‘पॉकेमॉन’च्या शोधात निघालेल्या दोन तरूणांवर गोळ्या झाडण्याचा प्रकार मध्य अमेरिकेतल्या ग्वाटेमाला देशात घडला. यात एका मुलाचा मृत्यू झाला असून दुस-या मुलाची प्रकृती गंभीर आहे. ही दोन्ही मुले ‘पॉकेमन गो’ हा खेळ खेळण्यासाठी एका निर्जन स्थळी गेले होते. जेसन आणि डॅनिअल अशी या दोन मुलांची नावे असून या दोघांचे वय १७ ते १८ दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार ‘पॉकेमन गो’ हा खेळ खेळत ‘पॉकेमन’ला शोधण्यासाठी हे दोघेही भावंडे निर्जन स्थळी चालत गेले. निर्जन स्थळी पोहचल्यावर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. परंतु त्यांच्यावर गोळीबार का करण्यात आला? हे मात्र पोलिसांना अद्याप समजलेले नाही. पण हा गेमच त्यांच्या जीवावर बेतला असे, पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलिसांना घटनास्थळी बंदुकीच्या २० गोळ्या सापडल्या. या दोन्ही मुलांवर वीस गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. तसेच या घटनास्थळी स्थानिकांनी पाहिलेल्या पांढ-या रंगाची गाडी देखील पाहिली होती. पोलीस या गाडीचा देखील शोध घेत आहेत.
जर ‘पॉकेमन गो’ खेळ खेळण्यासाठी माझ्या मुलांनी घर सोडलेच नसते तर ते आज जीवंत असते अशी प्रतिक्रिया मृत मुलांच्या आईने दिली आहे.
या गोळीबारानंतर या दोन्ही मुलांचे मोबाईल देखील गायब आहेत. काही दिवसांपूर्वी लाँच झालेल्या या खेळामुळे आतापर्यंत अनेक दुर्घटना घडल्या आहेत. या खेळाच्या वेडापायी एका व्यक्तीने पोलिसांच्या गाडीलाच धडक दिली होती. पण पोलिसांनी त्याला समज देऊन सोडून दिले.
तसेच ‘पॉकेमॉन’ला शोधण्यासाठी झाडाच्या फांदीवर चढलेल्या एका अल्पवयीन मुलीला देखील दुखापत झाली होती. बोस्नियामधला एक तरूण तर हा खेळ खेळता दुर्घटनाग्रस्त क्षेत्रात घुसला होता.