काहीजण त्यांच्या पाळीव कुत्र्यांना आपल्या कुटुंबाचाच भाग समजतात. त्यांची अगदी आपलेपणाने काळजी घेतात. मात्र काहीजण या प्राण्यांशी अगदी निर्दयीपणे वागतात. ग्रेट डेन जातीच्या एका कुत्र्यासोबत असेच काहीसे घडले आहे. या कुत्र्याच्या मालकाने त्याला रस्त्यात एका साखळीने बांधून ठेवले. त्यामुळे या कुत्र्याचा उपासमारीमुळे मृत्यू झाला.
चेन्नईतील श्रवण कृष्णन नावाच्या व्यक्तीने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून एका दुर्देवी ग्रेट डेन कुत्र्याची कहाणी सांगितली आहे. या कुत्र्याला वारंवार उलट्या होत होत्या. श्रवण कृष्णन यांनी या कुत्र्याला रुग्णालयात दाखल करण्याची तयारी सुरू केली. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला.
हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेनंतर श्रवण कृष्णन यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये श्रवण म्हणतात, “तुझे नाव, तुझे वय, तुला कोण सोडून गेले, तुझी पार्श्वभूमी, याबद्दल मला कोणतीही माहिती नाही. मी तुला वाचवू शकलो नाही, याबद्दल मला माफ कर. आता तू एका चांगल्या ठिकाणी असशील, अशी अपेक्षा आहे.”
आपल्या पोस्टमध्ये श्रवण पुढे म्हणतात, “एका ग्रेट डेन कुत्र्याला रस्त्यावर बांधून ठेवण्यात आल्याची माहिती मला कार्तिक सेल्वाराज नावाच्या एका व्यक्तीने दिली. आम्ही त्याला रूग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला.”
“तुमच्या कुत्र्याला रस्त्यात सोडून देणे, हा अतिशय मोठा क्रूरपणा आहे. किमान त्याला एक आसरा मिळवून द्यायला हवा होता किंवा एखाद्या व्यक्तीची मदत घ्यायला हवी होती. तुमच्या कुत्र्याला अशाप्रकारे उपासमारीने मरण्यासाठी अशाप्रकारे रस्त्यावर सोडू नका. अशाप्रकारे कोणाच्याही आयुष्याची अखेर होऊ नये”, असे आवाहन श्रवण यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केले आहे.
“ग्रेट डेन कुत्र्याच्या मरणासाठी जबाबदार असलेली व्यक्ती मला कधी भेटली तर मी त्याची हाडे मोडेन”, अशा शब्दांमध्ये श्रवण यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
मृत कुत्र्याच्या मालकाने दाखवलेला असंवेदनशीलपणा अतिशय निंदनीय आहे. कुत्रा हा अतिशय प्रामाणिक प्राणी असतो. आपल्या मालकाच्या भावना कुत्र्याला खूप उत्तम प्रकारे कळतात. मात्र एखाद्या मालकाने आपल्या कुत्र्याच्या भावना लक्षात न घेता त्याला मरण्यासाठी रस्त्यावर बांधून ठेवणे, हा प्रकार संतापजनक आहे.