‘सिमी’ या बंदी घातलेल्या संघटनेच्या गुप्त बैठकीत प्रक्षोभक भाषणे करून धार्मिक तेढ वाढवल्याच्या आरोपासाठी पाचपैकी दोन आरोपींना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने १४ वर्षांची सक्तमजुरी, तर तिघांना १२ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
२००६ साली अलुवानजीक पन्नायिकुलम येथे ‘सिमी’ या प्रतिबंधित संघटनेची ‘गुप्त’ बैठक आयोजित केल्याबद्दल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश के. एम. बालचंद्रन यांनी यापूर्वी या संघटनेच्या ५ कार्यकर्त्यांना बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली तसेच भारतीय दंडसंहितेनुसार दोषी ठरवले होते, तर ११ आरोपींची सुटका केली होती.
ही शिक्षा एकामागोमाग एक अशी भोगावी लागणार असल्यामुळे पी. ए. शादुली व अब्दुल रसिक या दोन आरोपींना प्रत्येकी १४ वर्षांची, तर अन्सर नादवी, निझामुद्दीन व शम्मी यांना प्रत्येकी १२ वर्षांची शिक्षा भोगावी लागेल. याशिवाय पहिल्या दोन आरोपींना न्यायालयाने प्रत्येकी ६० हजार रुपये, तर इतर तिघांना प्रत्येकी ५५ हजार रुपये दंडही ठोठावला. आरोपींनी भोगलेल्या रिमांडची मुदत मात्र त्यांच्या शिक्षेतून वजा केली जाणार आहे.