राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचा विधि शाखेच्या विद्यार्थ्यांना सल्ला

देशाची लोकशाही प्रक्रिया समजून घेण्यासाठी आणि प्रशासनात इच्छित बदल करण्यासाठी आधी राज्यघटनेचा नीट अभ्यास करा, असा सल्ला राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी रविवारी विधि शाखेच्या विद्यार्थ्यांना दिला. ‘नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी’च्या २४ व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते.

समता, न्याय आणि बंधुता या तत्त्वांवर आधारित असलेली भारताची राज्यघटना जगात सर्वोत्तम आहे. जात, धर्म, पंथ, लिंग यांवर आधारित भेदभावापासून राज्यघटनेने नागरिकांना मुक्ती दिली. भारताने राज्यघटना स्वीकारल्यापासूनच देशाच्या प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आणि हक्क लागू झाले आहेत. यामुळे राज्यघटनेचा नीट अभ्यास महत्त्वाचा असून सुदृढ लोकशाहीसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे, असे मुखर्जी म्हणाले.

ठरावीक कालावधीत होणारी निवडणूक ही केवळ औपचारिकता नाही. निवडणुकीत मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन आपल्याला अपेक्षित बदल घडवता येतो. केवळ कुंपणावर बसून दुसऱ्याने बदल घडवावा, अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे, असे मुखर्जी यांनी सांगितले. देशात तब्बल ३० वर्षांनंतर सार्वत्रिक निवडणुकीत एकाच पक्षाला बहुमत मिळणे ही मोठी गोष्ट आहे. या सरकारच्या गुण-दोषाबाबत मी बोलणार नाही. पण मतदारांनी एकाच पक्षाला बहुमत देऊन राजकीय परिपक्वता दाखवली हे महत्त्वाचे आहे, असे मुखर्जी म्हणाले. या वेळी राष्ट्रपतींनी २० गुणवान विद्यार्थ्यांना पदके प्रदान केली. त्यातील बहुतेक पदके मुलींनी पटकावल्याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला.