केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांची कबुली

नोटाबंदीचे फायदे जनतेला सांगण्यात भाजपला अपयश आल्याची कबुली केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी शनिवारी दिली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे योग्य गोष्टीच करतील, हा जनतेचा विश्वास नोटाबंदीच्या निर्णयाबाबतही सार्थ ठरला, असे नायडू यांनी सांगितले. भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

”नोटाबंदीचे फायदे काय आहेत, हे जनतेला सांगण्यात भाजप कार्यकर्ते कमी पडले. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयाला कॉंग्रेस आणि डाव्यांनी केलेला विरोध भाजप सरकारच्या पथ्यावर पडला. या दोन पक्षांच्या विरोधाचा उलटा परिणाम झाला आणि नोटाबंदीच्या निर्णयातून काहीतरी चांगले घडू शकते, याची जाणीव जनतेला झाली. नरेंद्र मोदी हे योग्य गोष्टच करतील, हा जनतेचा विश्वास त्यातून अधोरेखित झाला, असे नायडू म्हणाले. तेलंगण, आंध्रप्रदेश आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी नोटाबंदीचे समर्थन केले होते, याकडेही नायडू यांनी या वेळी लक्ष वेधले.

महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकांत मिळालेल्या यशाचा उल्लेख करत नायडू यांनी कार्यकर्त्यांनी आणखी परिश्रम घेण्याचे आवाहन केले. अनेक ठिकाणी पक्षाला विस्ताराला जागा आहे. मात्र, भाजप ११ कोटी सदस्य संख्या असलेला मजबूत पक्ष असून, देशभरात पक्ष पोहोचला आहे, असे नायडू म्हणाले. ओदिशा आणि तेलंगणमध्ये भाजप हा आता मुख्य विरोधी पक्ष बनणार असून, कालांतराने तेथे सत्तेतही येऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.