खगोलशास्त्राची भाकिते जाणून घेण्यासाठी अमेरिकेच्या वेधशाळांवर अवलंबून राहण्याची गरज नाही; एखादा पंडितही हे काम करू शकतो, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी प्राचीन भारतीय शास्त्रातील ज्ञानाचे महत्त्व सांगितले.
‘आपली प्रसारमाध्यमे अनेकदा गोंधळलेली असतात. अमेरिकी वेधशाळेने आपल्याला एका ठरावीक तारखेला सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण असल्याची माहिती दिली असल्याचे ते सांगतात..पण तुम्ही त्यासाठी वेधशाळेकडे पाहू नका, तुमच्या जवळपास राहणाऱ्या कुठल्याही पंडिताला विचारा. तो त्याच्याजवळचे ‘पंचांग’ उघडून गेल्या शंभर वर्षांतील आणि आगामी शंभर वर्षांतील ग्रहणांच्या तारखा सांगेल’, असे सिंह यांनी लखनौ विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात भाषण करताना सांगितले.
पृथ्वी १९६ कोटी वर्षांपासून अस्तित्वात असल्याचे आपल्या संतांनी सांगितले होते. पूर्वी विज्ञान हे स्वीकारत नव्हते, परंतु नंतर त्यांना ही गोष्ट स्वीकारावी लागली. ते काय सांगतात, तेच दूरचित्रवाहिन्या दाखवतात.. त्यांनी याबाबत पंडितांना विचारायला हवे, असे सांगून राजनाथ सिंह यांनी खगोलशास्त्र, विज्ञान आणि गणित या क्षेत्रांमध्ये प्राचीन भारताच्या योगदानाची प्रशंसा केली.
भारताजवळ जे ज्ञान आहे, ते इतर कोणत्याही देशाजवळ नाही, मग ती त्रिकोणमितीची प्रमेये असोत, बीजगणित असो किंवा इतर काही.. कुठलाही देश आपल्याकडील ज्ञानाशी बरोबरी करू शकत नाही. विश्वस्थितीबाबत (कॉस्मॉलॉजी) आपले आकलन आधुनिक वैज्ञानिक आकलनाशी तंतोतंत जुळणारे आहे, असेही गृहमंत्री म्हणाले.
उच्चशिक्षित युवक दहशतवादी कृत्यांमध्ये गुंतलेले असल्याचे उदाहरण देऊन सिंह म्हणाले, की नीतिमूल्यांशिवायचे ज्ञान हे समाजाकरता ‘अनर्थकारक’ ठरते. ज्या संस्कृती त्यांच्या परंपरा आणि नीतिमूल्ये यापासून दुरावतात, त्या फार काळ टिकू शकत नाहीत. भारतानेच मोठय़ा मनाने ‘वसुधैव कुटुंबकम्’चा संदेश दिला, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jan 2015 रोजी प्रकाशित
अमेरिकेची वेधशाळा जे सांगते,ते पंडितही सांगेल – राजनाथ सिंह
खगोलशास्त्राची भाकिते जाणून घेण्यासाठी अमेरिकेच्या वेधशाळांवर अवलंबून राहण्याची गरज नाही; एखादा पंडितही हे काम करू शकतो,
First published on: 20-01-2015 at 12:22 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why us observatories ask pandits to predict eclipse dates saya rajnath singh