आगामी विधानसभा निवडणुकांमुळे उत्तर प्रदेश सध्या राष्ट्रीय स्तरावरील राजकारणात सातत्याने चर्चेच आहे. मात्र, सध्या उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील भरत सिंग आणि त्याची पत्नी विभा हे जोडपे वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘प्रतिसादाने पावन’ झालेले हे जोडपे ‘सेलिब्रिटी कपल’ बनले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. काही दिवसांपूर्वी या जोडप्याने पत्राद्वारे केलेल्या विनंतीला मान देत मोदींनी भरत आणि विभाच्या मुलीचे नामकरण केले आहे. मोदींनी या मुलीचे नाव ‘वैभवी’ असे ठेवले आहे. खुद्द पंतप्रधानांनी मुलीचे नामकरण केल्यामुळे सध्या भरत आणि विभाला एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे वागणूक मिळत आहे. भरत आणि विभा मिर्झापूरच्या नयापुरा हंसीपूर या गावात राहतात. १३ ऑगस्ट रोजी विभाने मुलीला जन्म दिला तेव्हा तिने भरतशी चर्चा करून मुलीचे नामकरण करण्यासाठी मोदींना पत्र लिहण्याचा निर्णय घेतला. आम्हाला मुलगीच व्हावी असे नेहमीपासून वाटत होते. मुली या मुलांपेक्षा पालकांची जास्त काळजी घेतात. आमच्या मुलीचा जन्म झाल्यानंतर माझ्या पत्नीने तिचे नामकरण करण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहण्याचे ठरवले. पंतप्रधानांनी सुरू केलेल्या ‘बेटी बचाव’ अभियानामुळे आणि ऑलिम्पिकमध्ये भारताच्या दोन मुलींनी जिंकलेल्या पदकांमुळे आपल्या प्रेरणा मिळत असल्याचेही विभाने पंतप्रधानांना लिहलेल्या पत्रात म्हटले होते. १३ ऑगस्ट रोजी स्पीड पोस्टद्वारे हे पत्र पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आले होते. त्यानंतर २० ऑगस्टला भरत यांना पंतप्रधान कार्यालयाकडून फोन आला. फोनवरील व्यक्तीने भरतला पंतप्रधानांना तुमच्याशी बोलायचे आहे, असे सांगितले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी भरत आणि विभाशी तब्बल अडीच मिनिटे संवाद साधला. यावेळी त्यांनी मुलगी झाल्याबद्दल आमचे अभिनंदन करत तिचे नाव ‘वैभवी’ ठेवा, असे सांगितले.  या नावात मी आणि माझ्या पत्नीच्या नावाचा उल्लेख असल्यामुळे ‘वैभवी’ हे नाव योग्य ठरेल, असेही त्यांनी म्हटले. सुरूवातीला भरत आणि विभाने ही गोष्ट गावकऱ्यांना सांगितली तेव्हा त्यांनी ती हसण्यावारी नेली. त्यामुळे भरतने २२ ऑगस्टला पंतप्रधान कार्यालयात दूरध्वनी करून पंतप्रधानांनी पत्राला दिलेल्या प्रतिसादाची प्रत देण्याची विनंती केली. ३० ऑगस्टला स्पीड-पोस्टद्वारे ही प्रत भरत आणि विभाला मिळाली. यामध्ये पंतप्रधानांनी मुलगी झाल्याबद्दल भरत आणि विभाचे अभिनंदन केल्याचा उल्लेख होता. तसेच तुम्ही वैभवीच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण कराल आणि वैभवी तुमची ताकद बनेल, अशा शुभेच्छाही पंतप्रधानांनी दिल्या होत्या. हे पत्र दाखवल्यानंतर गावकऱ्यांना भरत आणि विभाच्या सांगण्यावर विश्वास बसला. त्यानंतर ही गोष्ट स्थानिक प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचल्याने भरत आणि विभा सध्या ‘सेलिब्रिटी कपल’ बनले आहेत.