देशाच्या संरक्षण सिद्धतेत आणखी भर टाकण्याच्या हेतूने भारताने अग्नी-५ या क्षेपणास्त्राची पहिली कॅनिस्टर चाचणी (डब्यात ठेवून उडवणे) यशस्वी केली.
या क्षेपणास्त्राची मारक क्षमता पाच हजार किलोमीटर असून त्याच्या मदतीने १ टन अण्वस्त्रे वाहून नेता येतात. पूर्व ओडिशातील व्हीलर्स बेटांवर रोड मोबाईल लाँचरवर असलेल्या डब्यातून हे क्षेपणास्त्र उडवण्यात आले. तीन स्तरांचे हे क्षेपणास्त्र घन इंधनावर चालते. प्रक्षेपण संकुल ४ येथून सकाळी आठ वाजून ६ मिनिटांनी ही चाचणी करण्यात आल्याचे एकात्मिक चाचणी क्षेत्राचे संचालक एमव्हीकेव्ही प्रसाद यांनी सांगितले.
शनिवारी करण्यात आलेली ही अग्नी ५ क्षेपणास्त्राची चाचणी अतिशय कमी तयारीत करण्यात आली. खुल्या चाचणीत तयारीला जास्त वेळ लागतो. उच्च विश्वासार्हता. दीर्घकार्यकाल, कमी निगा व दुरूस्ती व वाढीव चलनता ही या क्षेपणास्त्र चाचणीची वैशिष्टय़े होती
या कॅनिस्टर चाचणीमुळे या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण रस्त्यावरून किंवा रेल्वेवरून केले जाऊ शकते. शिवाय वापराबाबत गोपनीयता व मारक क्षमताही वाढते. जमिनीवर सिलॉस यंत्रणा लावूनही ही चाचणी करता येते पण त्याची टेहळणी केली जाऊ शकते व हल्ला होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिकांचे या यशस्वी चाचणीबद्दल अभिनंदन केले आहे.
भारतीय संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे मावळते संचालक अविनाश चंदर यांनी सांगितले की, हा अतिशय संस्मरणीय क्षण आहे. डीआरडीओचे हे मोठे यश आहे. डीआरडीओमधील सेवेत प्रत्येक क्षण आपण आनंदाने घालवला. समाधानाने आपण या सेवेतून जात आहोत.
मोहीम संचालक व्ही.जे. सेकरन यांनी सांगितले की, या मोहिमेची उद्दिष्टय़े पूर्ण झाली आहेत. काही जहाजांनी ही मोहीम यशस्वी झाल्याची निश्चिती केली. प्रकल्प संचालक राजेश गुप्ता यांनी हे ऐतिहासिक यश असल्याचे सांगितले.
चाचणीच्यावेळी हे क्षेपणास्त्र २० मीटरची उंची गाठू शकले. मोटारीच्या मदतीने नंतर त्याने ६०० कि.मी उंची गाठली. ते वातावरणात परत आले तेव्हा त्याने ४००० अंश सेल्सियस तापमानाचा सामना केला. आतील तापमान ५० अंश सेल्सियस होते. उष्णतेने बाहेरच्या आवरणाचे कार्बन-कार्बन संमिश्राचे ज्वलन झाले त्यामुळे क्षेपणास्त्र सुरक्षित राहिले.

अग्नीची वैशिष्टय़े
*लांबी १७ मीटर
*वजन ५० टन
*मारक क्षमता ५००० कि.मी
*अण्वस्त्र वहन क्षमता १ टन
*आंतरखंडीय क्षेपणास्त्र