ग्राहकांची दिशाभूल करणारी जाहिरात टेलिव्हीजनवर दाखविल्याप्रकरणी एअरटेल या टेलिकॉम सर्व्हिस देणाऱया कंपनीला अॅडव्हर्टाइझिंग स्टॅण्टर्ड काऊन्सिल ऑफ इंडियाने(एएससीआय) धक्का दिला आहे. एअरटेलने ‘४ जी’ च्या जाहिरातीमधून ग्राहकांची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवणारी नोटीस ‘एएससीआय’ने कंपनीला बजावली आहे. तसेच ही जाहिरात येत्या ७ ऑक्टोबरपर्यंत मागे घेण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ‘गडबड नाही यार, ४ जी आहे’, असे सांगणाऱया या जाहीरातीतच गडबड असल्याचे समोर आले आहे.
एअरटेलची ‘४ जी’ सेवा दाखल झाल्याची माहिती देणाऱया जाहिरामधील प्रमुख मॉडेल असलेली मुलगी  तिच्या मोबाईल इंटरनेट स्पीडपेक्षा अधिक जलदगतीने चित्रपट डाउनलोड करून दाखवले तर एअरटेल तुम्हाला मोबाइलचे बिल आयुष्यभर फुकटात देईल, असे इतरांना आव्हान करताना दिसते. शिवाय, जर इतर मोबाईल इंटरनेट सेवा पुरवणाऱयांचा इंटरनेट वेग एअरटेल ‘४ जी’ हून अधिक वेगवान असेल, तर एअरटेल कंपनी आयुष्यभर मोबाइल बिल फ्री देईल. मात्र, ही जाहिरात प्रसारित करताना कोणतेही अस्वीकृती (डिस्क्लेमर) दिलेले नाही. त्यामुळे जाहिरात वादात अडकली आहे. दरम्‍यान, आम्‍ही केलेल्‍या दाव्‍यावर आम्‍ही ठाम असून, हे ‘एएससीआय’ला पटवून दिले जाईल, असे एअरटेलने सांगितले आहे.