सीरियातील रक्तरंजित युद्धाला कारणीभूत असलेल्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया(इसिस) या दहशतवादी संघटनेच्या तळांवर रशियाच्या लढाऊ विमानातून करण्यात आलेला बॉम्ब हल्ला गो-प्रो कॅमेरात टिपण्यात आला आहे. हल्ल्याचा घटनाक्रम आणि परिणामांचा अंदाज घेण्यासाठी उच्च प्रतीच्या हल्ल्यांवेळी गो-प्रो कॅमेरा लढाऊ विमानात बसविण्यात येतो. एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने जारी केलेल्या या व्हिडिओमध्ये रशियन हवाई दलाच्या एसयू-२४ या लढाऊ विमानातून इसिसच्या तळांवर बॉम्ब टाकण्यात आल्याचे दिसते. बॉम्ब पडल्यानंतर झालेला परिणाम देखील विमानाच्या खाली बसविण्यात आलेल्या या गो-प्रो कॅमेराने टिपला आहे. लक्ष्याचा अचूक वेध घेण्यासाठी उच्च प्रतीच्या लेझर तंत्रज्ञानाचा वापर करून या बॉम्बचे नियंत्रण केले जाते.