प्रेमवीरांसाठी संशोधकांच्या चार गोष्टी युक्तीच्या!

तरुण वय असतं, त्या वयात तसं काहीतरी होत असतं, तो तिच्या प्रेमात पडत असतो पण तिचं मन जिंकायचं कसं. तिला हसवायचं कसं याचा उलगडा होता होताच, त्याचं प्रेम जुळण्याआधीच ती त्याला सोडून दुसऱ्याच कुणाच्या तरी प्रेमात पडलेली असते. वैज्ञानिकांनी अशा चाचपडणाऱ्या प्रेमवीरांना तिचं मन जिंकायचं कसं यावर संशोधनाअंती युक्तीच्या चार गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांच्या मते एखाद्या मुलीवर तुमचे प्रेम असेल व ती तुमच्या गमतीदारपणाला दाद देत खळखळून हसत मोकळेपणाने प्रतिसाद देत असेल तर तिला तुमचा सहवास आवडत आहे असे समजा. डेटिंगला जाण्यापूर्वीचा हा मूलमंत्र वैज्ञानिकांनी उलगडला आहे. तुम्ही दोघेही एकत्र असताना मनमुराद हसत असाल, तर तुमचे नाते पुढे जाण्यास हरकत नाही.
कन्सास विद्यापीठातील संज्ञापन अभ्यास विषयाचे प्राध्यापक जेफ्री हॉल यांच्या मते विनोद हा बुद्धिमत्तेचा निदर्शक असतो पण ते आपण सहजपणे मान्य करीत नाही. तुम्ही तिला भेटलात, हसलात, गमतीजमती सांगितल्यात, खूप आनंदी झालात, तीही आनंदी झाली तर ते चांगले लक्षण आहे. पुरुष विनोदाचा वापर कसा करतात व स्त्रिया त्याला कसा प्रतिसाद देतात यावर तुमचे प्रेम जुळणे अवलंबून असते. ज्या मुला-मुलींना एकमेकांचा परिचय नव्हता अशा ५१ जोडय़ांवर हा प्रयोग करण्यात आला. त्यांना जोडीने खोलीत बसवून १० मिनिटे संभाषण करण्यास सांगण्यात आले व नंतर पाहणी पद्धतीने माहिती घेण्यात आली. पुरुषच जास्त वेळा गमतीजमती-विनोद करतात व स्त्रिया त्याला दाद देत असतात असे दिसून आले. पुरुषाचं एखाद्या स्त्रीवर प्रेम आहे की नाही हे पाहण्याचे तिने केलेला विनोद व त्यावर त्याचा प्रतिसाद हे साधन नाही. जेव्हा दोघेही हास्यात मश्गुल असतील तेव्हा त्यांचे सूत अधिकच चांगले जुळले आहे असे मात्र म्हणता येते. एखादी व्यक्ती दुसऱ्याकडून सामाजिकदृष्टय़ा स्वीकारली जाते आहे, याचे हास्य व त्यावरचा प्रतिसाद हे प्रतीक आहे, तुमच्या विनोदाला तिने नैसर्गिक प्रतिसाद दिला, तर तुमचे नाते
योग्य दिशेने चालले आहे असे समजा. पुरुषाने विनोद केला आणि ती हसली तर ते नाते जास्त टिकणारे ठरू शकते. तिने विनोद केला व तो हसला
तर तो काही वेळा जाणूनबुजून
दिलेला प्रतिसाद असतो, त्यात स्वाभाविकता असेलच असे नाही, ‘इव्होल्यूशनरी सायकॉलॉजी’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
* तुमच्या विनोदावर तिचा प्रतिसाद महत्त्वाचा
* तिच्या विनोदावर तुमचे हसणे फार काही दर्शवत नाही.
*हास्यावरील प्रतिसाद हा सामाजिक स्वीकार्यतेचे निदर्शक
*दोघेही एकमेकांच्या सान्निध्यात खळखळून हसाल तर नाते जास्तच दृढ