काँग्रेसचा दीर्घकाळ सहयोगी असलेल्या ‘मजलीस-ए-इत्तेह्दुल मुस्लिमीन’ (एमआयएम) या पक्षाने केंद्र व आंध्र प्रदेशातील सरकारचा पाठिंबा मागे घेतला आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. आंध्र प्रदेश विधानसभेचे संख्याबळ २९४ असून तेथे ‘एमआयएम’चे सात सदस्य आहेत. गेल्या काही वर्षांत अल्पसंख्याक मुस्लिमांना अनेक वेळा ठरवून लक्ष्य केले जात असल्याचा आरोप ‘एमआयएम’ चे एकमेव लोकसभा सदस्य असदुद्दीन ओवैसी यांनी येथे केला. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांच्या सरकारने संघ परिवारास मोकळे रान दिले असल्याचेही ओवैसी म्हणाले.