इजिप्तचे अध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांनी देशातील लष्कराला पोलिसांचे अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे. इस्लामी राज्यघटनेवरील सार्वमतास चार दिवसांचा कालावधी उरला असताना अध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांच्या ताज्या निर्णयामुळे पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
मोर्सी यांनी सोमवारी याबाबतचा हुकूमनामा प्रसारित केला असून यामध्ये लष्कराला पोलिसांप्रमाणेच नागरिकास अटक करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. सार्वमतावरील निकालाची घोषणा होईपर्यंत देशात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी लष्कराने पोलिसांना सहकार्य करावे, असा आदेश मोर्सी यांनी दिला.
मोर्सी यांच्या या निर्णयामुळे लष्कराला अमर्यादित अधिकार प्राप्त झाले असून इजिप्तची पुन्हा एकदा लष्करशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे, अशी भीती विरोधकांनी व्यक्त केली आहे. इजिप्तचे हुकूमशाह होस्नी मुबारक यांना पदच्युत करून सत्तेवर आलेल्या मोहम्मद मोर्सी यांची कारकीर्दही वादग्रस्त बनली आहे.
मोर्सी यांनी यापूर्वी एका निर्णयाद्वारे स्वत:कडे अमर्याद अधिकार घेतले होते. त्याविरोधात झालेल्या तीव्र जनआंदोलनापुढे झुकून त्यांनी अमर्याद अधिकार घेण्याचा निर्णय मागील आठवडय़ात रद्द केला. मात्र त्याच वेळी इस्लामी राजवटीचा पुरस्कार करणाऱ्या वादग्रस्त मसुद्यावरील सार्वमताची तारीख पुढे ढकलण्यास त्यांनी नकार दिला.