इस्रायल व पॅलेस्टाइन यांच्यात अलीकडच्या आठवडय़ांध्ये तणाव वाढून अनेक जणांचा मृत्यू झाला असल्याच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे सोमवारी येथे एका रात्रीपुरत्या दौऱ्यावर आगमन झाले.

राष्ट्रपती अम्मानहून इस्रायलच्या तेल अविवमधील बेन- गुरियन विमानतळावर पोहोचले आणि तेथून पॅलेस्टिनिअन प्राधिकरण (पीए) क्षेत्राला रवाना झाले. मंगळवारी इस्रायलच्या तीन दिवसांच्या भेटीसाठी परत येण्यापूर्वी तेथे त्यांचे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.

या भागातील गुंतागुंतीच्या परिस्थितीमुळे, राष्ट्रपती व त्यांचा लवाजमा बेन- गुरियन विमानतळावरून इस्रायलला पॅलेस्टानपासून विभाजित करणाऱ्या बिटुनिया तपासणी नाक्यावर पोहोचले. या ठिकाणी मुखर्जी व त्यांच्यासोबतच्या शिष्टमंडळाच्या सदस्यांना इस्रायली वाहने बदलून पॅलेस्टाइनने सीमेपलीकडे तैनात केलेल्या वाहनांमधून जावे लागले.

पॅलेस्टाइनचे शिक्षणमंत्री साबरी सैदान यांनी या तपासणी नाक्याजवळ राष्ट्रपतींचे स्वागत केले.