जर्मनीतील पक्षीशास्त्र संस्थेच्या वैज्ञानिकांचा निष्कर्ष
माणसांमध्ये स्त्री-पुरूषांचे प्रेम कसे जुळते या प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात देणे कठीण असले, तरी या जोडय़ा जुळण्यामागे शरीरातील रसायनांपासून अनेक कारणे असतात. पक्ष्यांमध्येही प्रेम जुळते व ते अगदी माणसांसारख्याच पद्धतीने जुळते, मोराचा पिसारा फुलणे हे पक्ष्यांमधील मिलनाच्या संकेताचे एक उदाहरण आहे. जर्मनीतील मॅक्स प्लँक पक्षिशास्त्र संस्थेच्या वैज्ञानिकांनी याबाबत संशोधन केले आहे. त्यांनी याबाबत जो प्रयोग केला त्याचे नाव ‘न्यू स्पीड डेटिंग एक्सपिरिमेंट’ असे आहे.
पक्ष्यांमधील जोडीदार निवडीवर हा प्रयोग आधारित होता. झेब्रा जेव्हा जोडीदार निवडून सहजीवन सुरू करतो तेव्हा माणसासारखेच गुणधर्म दाखवतो व पिलांच्या पालनपोषणाची जबाबदारी वाटून घेतो. बऱ्याच प्रमाणात तो जोडीदाराशी एकनिष्ठ असतो. आताच्या या प्रयोगात १६० पक्षी निवडण्यात आले व त्यात २० नर- २० मादी असे गट करण्यात आले, एकदा या पक्ष्यांच्या जोडय़ा जुळल्या की त्यातील निम्मी जोडपी माणसासारखी बंधनात अडकतात. पक्ष्यांच्या निम्म्या जोडप्यात संशोधकांनी हस्तक्षेप केला व सुखी जोडप्यात दुरावा निर्माण करून त्यांना प्रेमभंग झालेल्या दुसऱ्या जोडीदारांकडे नेण्यात आले. पक्ष्यांची जोडपी सुखी असोत की नाराज, ते पिले जन्माला घालतात. त्यांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यात आला तसेच मेलेल्या गर्भाची व वाचलेल्या पिलांची संख्या मोजण्यात आली. सरतेशेवटी या सगळ्यातून वाचलेल्या पिलांची संख्या ही निवडलेल्या जोडप्यांपेक्षा न निवडलेल्या जोडप्यांपेक्षा ३७ टक्के जास्त होती. जबरदस्तीने जोडय़ा जमवलेल्या पक्ष्यांच्या घरटय़ात न उबवलेली अंडी, नैसर्गिक प्रेमातून जमलेल्या जोडय़ांच्या घरटय़ात न उबवलेल्या अंडय़ांपेक्षा तीन पटींनी अधिक होती. अनेक पिलांचा जन्म पहिल्या ४८ तासांत झालेला होता ज्या काळात त्यांना पक्ष्यांच्या रूपातील त्यांच्या पालकांकडून काळजी घेतली जाण्याची गरज अधिक होती. न जुळवलेल्या जोडप्यातील नर पक्षी हे घरटय़ांची काळजी व इतर बाबीत फार रस घेत नव्हते. पण यात एक रंजक गोष्ट अशी की, जोडी न जुळवलेल्या व जोडी जुळलेल्या जोडप्यांमध्ये नर पक्षी मादीची सारखीच काळजी घेत होते.
जोडी न जुळवलेल्या जोडप्यात मादी पक्षी नराच्या प्रियाराधनेला फारसा प्रतिसाद देत नव्हते. ज्यांच्या जोडय़ा नैसर्गिकरीत्या जमलेल्या नव्हत्या त्यांच्यात प्रेम फारसे नव्हतेच, जे स्वपसंतीने निवडलेल्या जोडय़ांमध्ये होते. ज्यांच्या जोडय़ा जुळवलेल्या होत्या त्यातील नर पक्षी हे बाहेरख्याली होते, मादी पक्ष्यांमध्ये मात्र ते प्रमाण कमी होते. पक्ष्यांमधील माद्यांना नैसर्गिक इच्छा झाल्यानंतरच त्या समागम करतात व त्यातून जन्मलेल्या पिलांची काळजी घेतली जाते. त्यांची जनुकेही पिलांमध्ये येतात. आपल्याला वाटतात त्यापेक्षा पक्ष्यांच्या लैंगिक प्रेरणा वेगळ्या असतात. ‘प्लॉस बायॉलॉजी’ या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.