१५०० किमी लांब, सात किमी रुंद, विविध उपनद्या मिळालेल्या.. हे चित्र आहे मंगळ ग्रहावरचे. लाल पृष्ठभागाने आच्छादलेल्या मंगळ ग्रहावर कोटय़वधी वर्षांपूर्वी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात नदी वहात होती याचे पुरावे हाती लागले आहेत. येथील युरोपियन अवकाश संशोधन संस्थेच्या ‘मार्स एक्स्प्रेस’ या उपग्रहाने ही छायाचित्रे टिपली आहेत.
मंगळ ग्रहावर सजीवसृष्टी आहे का किंवा होती का, तेथील वातावरण सजिवांसाठी पोषक आहे का या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी युरोप-अमेरिकेने ‘मिशन मार्स’ची आखणी केली आहे.
या मिशनला अद्याप म्हणावे तसे यश मिळालेले नसले तरी मंगळ ग्रहावर पाण्याचे अस्तित्त्व असल्याच्या खाणाखुणा हाती लागल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे मंगळाच्या पृष्ठभागावर सापडलेले हे विशाल नदीपात्र.
कुठे आहे हे नदीपात्र?
मंगळ ग्रहावर रेऊल व्हॅलिस असे नाव देण्यात आलेल्या पर्वतीय प्रदेशात या नदीच्या खाणाखुणा आढळलेल्या आहेत. सपाट पृष्ठभाग, डोंगर रांगा, खोल दऱ्या असा हा प्रदेश असून याच प्रदेशातून किमान साडेतीन ते दीड अब्ज वर्षांपूर्वी नदी वहात असावी असा शास्त्रज्ञांचा कयास आहे.
विशाल पात्र
नदीचे पात्र कोरडेठाक असले तरी पाण्याचा प्रवाह किमान १५०० किमी अंतरापर्यंत वहात गेल्याच्या स्पष्ट खुणा मार्स एक्स्प्रेसने घेतलेल्या छायाचित्रात दिसतात. नदीचे पात्रही सात किमी रुंद असल्याचे त्यातून स्पष्ट होते. या विशाल पात्रात परिसरातील अनेक छोटय़ा नद्याही येऊन मिळत होत्या असेही पृष्ठभागावरील खुणांवरून आढळून
येते.
पाणी कुठे गेले?
मंगळावरील वातावरणाच्या परिणामामुळे येथील पाण्याचे बाष्पीभवन झाले असेल असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या पात्रात नदीऐवजी बर्फही असू शकेल असाही अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. या नदीच्या पात्रामुळे मात्र मंगळ ग्रहाचे गूढ अधिक वाढले आहे.