चौकशी अहवाल सादर

मलेशियाच्या एअरलाइन्सचे एमएच-१७ हे  विमान बीयूके क्षेपणास्त्र डागून पाडण्यात आले असल्याचा हवाला अधिकृत तपास अधिकाऱ्यांनी दिल्याचा दावा या दुर्घटनेत ठार झालेल्यांच्या नातेवाईकांनी दिला आहे. मात्र डच अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासाच्या विरुद्ध आमचा अहवाल असल्याचे सदर क्षेपणास्त्राचे उत्पादन करणाऱ्या रशियाने स्पष्ट केले आहे.

मलेशियाच्या एअरलाइन्सचे एमएच १७ विमान रशियन बनावटीचे बीयूके क्षेपणास्त्र पूर्व युक्रेनमधून सोडून खाली पाडण्यात आल्याचे आंतरराष्ट्रीय चौकशीकर्त्यांनी म्हटले आहे. याबाबतचा अंतिम अहवाल डच लष्करी तळावर आज प्रसारित करण्यात आला. मलेशियन एअरलाइन्सचे हे बोइंग ७७७ विमान पाडल्याने २९८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता १५ महिन्यांनी हा चौकशी अहवाल आला आहे.

‘फोकरांट’ वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे, की बीयूके हे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र अ‍ॅमस्टरडॅमहून कौलालम्पूरकडे जाणाऱ्या विमानावर १७ जुलै २०१४ रोजी डागण्यात आले होते, असे चौकशीत स्पष्ट झाले आहे.

या अहवालात अपघातस्थळाचे नकाशे आहेत, तेथे या विमानाचा सांगाडा युक्रेनमधील ग्राबोवे खेडय़ातील शेतात पडला होता. रशियाने विमान पाडल्याचा इन्कार केला होता. त्या वेळी रशियाचे ३३ हजार सैनिक युक्रेननजीक सीमेवर होते व युक्रेनच्या सैन्याने हे क्षेपणास्त्र डागले होते.

डच सुरक्षा मंडऴाने चौकशीचे नेतृत्व केले होते व जे बीयूके क्षेपणास्त्र विमानावर डागण्यात आले होते, ते रशियात तयार केलेले होते. बंडखोर सैनिक असे क्षेपणास्त्र टाकू शकत नाहीत किंबहुना त्यांना ते हाताळण्याचे ज्ञान असणे शक्य नाही, त्यामुळे रशियन लष्करी अधिकाऱ्यांचा त्यात हात होता, अशी शक्यता या चौकशी अहवालात म्हटले आहे.