लातूर येथील गणपती विसर्जनाची मिरवणूक राजकीय घोषवाक्यांनी भलतीच गाजली. ‘अलविदा महापौर’ पासून ते थेट आमदार अमित देशमुखांच्या कार्यपद्धतीवर टीका करणारे फलक मिरवणुकीत होते. नेत्यांनीही आचारसंहितेपूर्वी स्वत:च्या पक्षाचा पद्धतशीरपणे प्रचार केला. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीतील राजकारण सध्या चर्चेत आहे.
 लातूरच्या परंपरेला साजेशी अशी गणपती विसर्जनाची मिरवणूक पार पडली. सुमारे १२ तास मिरवणूक सुरू होती. शहरातील विविध भागात विसर्जनाची सोय केली असल्यामुळे मुख्य मिरवणुकीवरील ताण चांगलाच कमी झाला त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवरीलही ताण हलका झाला.
शहरातील औसा रोड, अंबाजोगाई रोड, बार्शी रोड, नांदेड रोड अशा विविध भागात गणेश विसर्जनाची सोय करण्यात आली होती. मुख्य मिरवणुकीतील गणेशाचे विसर्जन सिद्धेश्वर मंदिर परिसरातील विहिरीत करण्यात आले. दुपारी ४ वाजता भारत रत्नदीप आझाद गणेश मंडळ या मानाच्या आजोबा गणपतीपासून मिरवणुकीला प्रारंभ झाला. जयिहद गणेश मंडळ, शिवतरुण गणेश मंडळ, अमर गणेश मंडळ, प्रभात गणेश मंडळ याबरोबरच औसा रस्त्यावरील मिरवणुकीत केशवराज विद्यालय, जनकल्याण निवासी विद्यालय समूहाचे मिरवणुकीत विशेष आकर्षण होते. पहाटे ४.१५ वाजता शेवटच्या गणपतीचे विसर्जन झाले. महापालिकेने विसर्जनासाठी चोख व्यवस्था केली होती.
औसा रस्त्यावर पहिल्यांदाच तीन ठिकाणी गणेशभक्तांचे स्वागत करण्यासाठी मंडप उभारण्यात आले होते. मल्लखांब, मर्दानी खेळ, लेझीम पथक हे केशवराजच्या मिरवणुकीचे वैशिष्टय़ होते. ढोलताशाच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत महिलांचा विशेष सहभाग होता. मेघालय विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थीही अतिशय उत्साहात या मिरवणुकीत सहभागी होते.
मुख्य मिरवणुकीत देखावे पाहण्यात लोकांचा उत्साह होता. विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे या दोघांना श्रद्धांजली वाहणारे फलक बहुतांश गणेश मंडळांनी मिरवणुकीत ठेवले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीने यावर्षी समाज प्रबोधनाचे अनेक देखावे सादर केले. स्त्री-पुरुष समानता, पर्यावरण, नागरी स्वच्छता, नागरी समस्या या विषयांवर भर देण्यात आला होता. विसर्जन मिरवणुकीतील मुख्य आकर्षण हे अमर गणेश मंडळाचा देखावा असतो. सर्वपक्षीय कार्यकत्रे या मंडळात सहभागी असले तरी शहरातील समस्या बेधडकपणे देखाव्यातून मांडल्या जातात. महापौर स्मिता खानापुरे यांचा कार्यकाल संपत आला. त्यांच्या कार्यकाळात काँग्रेसच्याच मंडळींनी अडचणी निर्माण केल्या, त्यामुळे त्यांना नीट काम करता आले नाही, याची खंत देखाव्यात व्यक्त करण्यात आली होती. ‘अलविदा महापौर’ हा फलक लोकांचे लक्ष वेधून घेत होता. आघाडी सरकारवर टीका करणारा ‘कर्जात महाराष्ट्राला बुडवूया’, ‘भ्रष्टाचारात पुढे महाराष्ट्र माझा’ हा फलकही मिरवणुकीचे आकर्षण होता.
लातूरचे अभिनेते रितेश देशमुख यांच्या ‘लई भारी’ या चित्रपटाचा मथळा घेऊन ‘नेता आमचा लई भारी, निर्णय त्यांचे त्याहून भारी’ या फलकावर पाण्याचे खासगीकरण, एलबीटीचा प्रश्न, निवडणुकांची चाहूल लागताच कामाची उद्घाटने डझनावरी, जनता झाली कावरीबावरी, नेता आमचा लई भारी अशा पंक्ती झळकत होत्या.
महापालिका, लातूर भांडी असोसिएशन, वासवी क्लब, सुभाष चौक मित्रमंडळ, मध्यवर्ती सार्वजनिक गणेश मंडळ यांचे स्वागत मंडप उभारण्यात आले होते. हनुमान चौक व भांडी गल्लीत गणेशभक्तांसाठी प्रसादाचे वाटपही करण्यात येत होते. किरकोळ रेटारेटीचे प्रकार वगळता मिरवणूक शांततेत पार पडली.
राजकीय पक्षांचा थेट प्रचार
गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठय़ा संख्येने भक्तगण उपस्थित असतात. त्यांच्यासमोर जाण्यासाठी काँग्रेस व शिवसेनेने या मिरवणुकीचा वापर करून घेतला. विलासराव देशमुख युवा मंचच्या वतीने शहरातील औसा रोड भागात स्वागतकक्ष उभा करण्यात आला होता. अनेक गणेशभक्तांना विलासराव देशमुख व अमित देशमुख यांचे छायाचित्र असलेले टी शर्टही वाटप करण्यात आले होते. विविध गणपतीच्या समोर अमित देशमुखांचे छायाचित्र लावण्यात आले होते. तर शिवसेनेने विसर्जन मिरवणुकीत  ‘आवाज कुणाचा, शिवसेनेचा’ ही पारंपरिक घोषणाही सुरू ठेवली होती. पुढील महिन्यात निवडणूक असल्यामुळे आचारसंहितेपूर्वी याचा लाभ उठवला गेला. सुभाष चौकात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पप्पू कुलकर्णी हे ठाण मांडून होते, तर राज्यमंत्री अमित देशमुख यांनी पहिल्यांदाच गणेश विसर्जन मिरवणुकीत हजेरी लावली.
पोलिसांची दंडेलशाही
गणेश विसर्जन मिरवणूक अतिशय शांततेत पार पाडण्यात लातूरकरांची ख्याती आहे. सर्व गणेशभक्त संयमाने मिरवणुकीत सहभागी होतात. गणेश उत्सवापूर्वी पोलीस खात्यात नवे अधिकारी बदलून आल्यामुळे त्यांना शहरातील परंपरा माहिती नव्हती. सुभाष चौकात औसा हनुमान गणपती हा शेवटचा असतो. त्याची आरती करण्याची प्रथा गेल्या काही वर्षांपासून आहे. मात्र त्या आरतीलाच जिल्हा पोलीसप्रमुखांसह सर्वानी विरोध करून गणेशभक्तांनाच धमकावण्याचा प्रयत्न केला. छायाचित्रकारांनाही धक्काबुक्की करण्यात आली. पोलिसांच्या दंडेलशाहीबद्दल गणेशभक्तांत तीव्र नाराजी होती. मिरवणुकीपूर्वी किमान शहराची परंपरा काय आहे, याची माहिती पोलिसांनी घ्यायला हवी होती, असे गणेशभक्तांचे म्हणणे आहे.

Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
kolhapur, cracks on ambabai mahalaxmi idol
अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप