पहिल्यांदा मतदान करणाऱ्या महिलांना गोव्यामध्ये निवडणूक अधिकाऱ्यातर्फे गुलाबी टेडी भेट देण्यात आले. तरुण वर्गाला मतदानासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून हा उपक्रम करण्यात आल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटले. गोव्यामध्ये अनेक ठिकाणी या प्रकारचे बूथ तयार करण्यात आले होते. या बूथला पिंक बूथ असे म्हटले गेले आहे. गोव्यामध्ये एकूण ३२,३५४ नवीन मतदाते होते. त्यामध्ये १८,१७२ महिलांचा समावेश होता. प्रत्येक मतदारसंघामध्ये एक बूथ पिंक बूथ ठेवण्यात आला होता.

प्रथमच मतदान करणारी राची देसाई ही अशाच एका पिंक बूथवर गेली होती. जेव्हा ती या ठिकाणी आली तेव्हा तिचे हसून स्वागत करण्यात आले. हा बूथ नावाप्रमाणेच पिंक बूथ होता. या ठिकाणी सर्व काही गुलाबी होते. पिंक गुलाबी रंगांच्या फुग्यांनी आणि रिबिनीने हा बूथ सजविण्यात आलेला होता. तर आतमधील टेबलक्लोथदेखील गुलाबी होते. निवडणूक अधिकारी रत्नाकर मयेकर यांनी तिला मतदान झाल्यानंतर टेडी बीअर दिले आणि प्रथम मतदानाचा हक्क बजावल्याबदद्ल अभिनंदन केले. प्रथमच लोकशाहीमधील एक महत्त्वपूर्ण कर्तव्य बजावल्याचा आनंद राचीच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.

हा प्रयोग नक्कीच अनोखा आहे असे ती म्हणाली. एखाद्याला परीक्षेला यावे याप्रमाणे मी येथे आले होते असे देखील ती म्हणाली. त्यामुळे मी थोडाशी ‘नर्व्हस’ होते असे ती म्हणाली. परंतु या ठिकाणी आल्यानंतर येथील वातावरण पाहून मी भारावले. निवडणूक अधिकाऱ्यांनी मला योग्य त्या सूचना दिल्या आणि मी माझा मतदानाचा हक्क बजावला असे राची म्हणाली. परंतु, टेडी स्वीकारताना राचीसमोर एक मोठा पेच उभा राहिला होता.

राचीचा आवडता रंग हा काळा आहे परंतु तिला सर्वांप्रमाणे गुलाबी डेटी मिळाला. असे असली तरी मी खूप खुश आहे असे ती म्हणाली. या प्रकारची भेट प्रथम मतदात्यांना देणे म्हणजे आमच्या प्रती प्रशासनाने जो जिव्हाळा दाखवला आहे त्याचे प्रतीक असल्याचे ती म्हणाली. प्रथम निवडणुकीचा हक्क बजावणाऱ्या मुलांना पेन देण्यात आले. पिंक बूथवर बाकीच्या बूथ पेक्षा ५ टक्के मतदान जास्त झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी म्हटले. गोव्यामध्ये विक्रमी मतदानाची नोंद झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गोव्यामध्ये ८३ टक्के मतदान झाले आहे. गोव्यात शांततापूर्ण मतदान झाल्यामुळे निवडणूक आयोगाने गोव्यातील मतदारांचे आभार मानले आहे.