मुंबई विद्यापीठाच्या श्रेणांक आणि गुणांक पद्धतीमधील ६०:४०चे सूत्र बदलून ७५:२५ करण्यात आले आहे. हे सूत्र बीएमएमच्या विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक असून ते बदलण्याची मागणी करीत दादर येथील कीर्ती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शनिवारी अंतर्गत परीक्षा देण्यास नकार दिला. यामुळे बीएमएमच्या विद्यार्थ्यांचा नव्या सूत्राबाबतचा रोष उघड झाला आहे.
मुंबई विद्यापीठात गेल्या तीन वर्षांपासून श्रेणांक आणि गुणांक पद्धती लागू करण्यात आली आहे. तेव्हापासून ही पद्धती वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. सुरुवातीला या प्रणालीला ६०:४० सूत्र लावण्यात आले होते. म्हणजे ६० गुणांची परीक्षा विद्यापीठ घेणार, तर ४० गुणांचे महाविद्यालयात अंतर्गत मूल्यमापन केले जाणार. पण या सूत्राचा काही महाविद्यालयांनी गैरफायदा घेतला आणि अंतर्गत परीक्षेत विद्यार्थ्यांना ४० पैकी ४० गुण देण्यात आले. यानंतर हे सूत्र बदलून ७५:२५ असे करण्यात आले. अंतर्गत मूल्यमापनाच्या २५ गुणांमध्ये २० गुणांची अंतर्गत परीक्षा आणि ५ गुण वर्गातील उपस्थिती आणि वर्तणुकीला आहेत.  
मात्र बीएमएमचा अभ्यासक्रम लक्षात घेता त्यांना सातत्याने विविध प्रकल्पांवर करावे लागत असल्यामुळे  या विद्यार्थ्यांसाठी ७५:२५ हे सूत्र चुकीचे असल्याची ओरड या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांकडून होत होती. पण या मागणीवर विद्यापीठ प्रशासनाने कोणताही सकारात्मक विचार केला नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी शनिवारी महाविद्यालयात घेण्यात येत असलेल्या अंतर्गत परीक्षेवर बहिष्कार टाकून नव्या सूत्राला विरोध दर्शविला. महाविद्यालयातील सुमारे १५० विद्यार्थ्यांनी या परीक्षेला विरोध दर्शविला असून विद्यापीठाशी संलग्नित सर्वच महाविद्यालयांतील बीएमएमच्या विद्यार्थ्यांनी या बहिष्कारात सहभागी व्हावे, असे आवाहन कीर्ती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले आहे.
बीएमएमसाठी ६०:४० हेच सूत्र योग्य असून त्याची अंमलबजावणी करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. यासंदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. मगरे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.