राज्यातील एमबीबीएस आणि बीडीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या ‘सामायिक प्रवेश परीक्षे’तील (एमएच-सीईटी) उणे (निगेटिव्ह) मूल्यांकन पद्धती रद्द करण्याच्या निर्णयावर वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी शिक्कामोर्तब करत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.
एमएच-सीईटीतील उणे मूल्यांकन पद्धती २०१५ पासून रद्द करण्याच्या निर्णयाला आधीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने तत्त्वत: मान्यता दिली होती. तावडे यांनी विधिमंडळ अधिवेशनातच याबाबत घोषणा करून राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.
एमएच-सीईटी ही २०१३ मध्ये ‘नीट’ या केंद्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या सीईटीच्या धर्तीवर घेण्यात येते, त्यामुळे ‘नीट’च्या काठिण्य पातळीसह त्यात असलेली उणे मूल्यांकन पद्धतीही राज्याने स्वीकारून त्यानुसार २०१४ मध्ये एमएच-सीईटी घेतली. या परीक्षेचे स्वरूप बहुपर्यायी असते, मात्र चुकीच्या उत्तरांमुळे गुण कमी होण्याच्या भीतीने बहुतेक विद्यार्थ्यांनी ज्या प्रश्नांच्या उत्तरांबाबत शंका होती ती उत्तरे लिहिणेच टाळले होते. त्याचा विपरीत परिणाम एमएच-सीईटीच्या निकालावर झाला होता. वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमालीची घटून १,४८,३९४ परीक्षार्थीपैकी केवळ साडेतीन हजार विद्यार्थीच प्रवेशपात्र ठरले होते. २०१२ मध्ये झालेल्या एमएच-सीईटीच्या तुलनेत हे प्रमाण अवघे पाच टक्के होते.
एमएच-सीईटीत योग्य उत्तर असलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी चार गुण दिले जातात, तर उणे मूल्यांकनामध्ये एका प्रश्नाचे उत्तर चुकल्यास एक गुण वजा केला जातो. या उणे गुणांकनाच्या भीतीमुळे हजारो विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्नांचे रकाने न सोडविताच रिकामे ठेवले होते. २०१२ मध्ये वैद्यकीय प्रवेशासाठी २८,६१६ विद्यार्थी पात्र ठरले होते. पात्रतेचे हे प्रमाण त्या वेळी १३.२७ टक्के होते. २०१४ मध्ये केवळ ७५०६ विद्यार्थी पात्र ठरले, कारण सीईटीत ५० टक्के गुण असतील तरच विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशांकरिता पात्र ठरतो. मात्र, उणे मूल्यांकनामुळे कित्येक विद्यार्थी किमान गुणांचीही कमाई करू शकले नव्हते. अर्थात वैद्यकीयच्या जागा मुळातच कमी असल्याने त्याचा सरकारी महाविद्यालयांमधील प्रवेशांवर परिणाम होण्याची शक्यता नव्हती; पण उणे मूल्यांकनाच्या धसक्याचा विपरीत परिणाम होत असल्याने वैद्यकीय संचालनालयाने ही पद्धत रद्द करण्याची सूचना वैद्यकीय शिक्षण विभागाकडे केली होती.
एमएच-सीईटीत योग्य उत्तर असलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी चार गुण दिले जातात, तर उणे मूल्यांकनामध्ये एका प्रश्नाचे उत्तर चुकल्यास एक गुण वजा केला जातो. या उणे गुणांकनाच्या भीतीमुळे हजारो विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्नांचे रकाने न सोडविताच रिकामे ठेवले होते. उणे मूल्यांकनामुळे कित्येक विद्यार्थी किमान गुणांचीही कमाई करू शकले नव्हते.