शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरक्षणातील २५ टक्के प्राथमिक शाळाप्रवेशासाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन प्रक्रियेला अद्याप म्हणवा तितका प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. याचबरोबर यासाठी उभारण्यात आलेल्या मदत केंद्रांवरही पालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिकदृष्टय़ा दुर्बल असलेल्यांना प्रवेश मिळवा यासाठी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या जागांवर प्रवेशासाठी गेल्या वर्षी अनेक ठिकाणी गोंधळ झाला होता. त्यामुळे यावर्षीपासून ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. ही प्रक्रिया सुरू होऊन १० दिवस उलटून गेले तरी गुरुवार रात्रीपर्यंत २४३२ अर्जच दाखल झाले होते. यातील केवळ ४१६ अर्ज पालिकेच्या मदत केंद्रांतून भरले गेले आहेत. उर्वरित अर्ज बाहेरून भरले गेले आहेत.
या केंद्रांवर पालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. यामध्ये केंद्रांवर अपुरी माहिती मिळणे, इंटरनेट हळू चालणे अशा समस्या आहेत. या समस्या तात्पुरत्या असून त्यावर वेळीच तोडगा काढण्यात येत असल्याचे मुंबई महापालिकेच्या शिक्षणाधिकारी शुभांगी जोगी यांनी स्पष्ट केले.