राज्यात गेल्या दोन वर्षांत केवळ एकाच नवीन महाविद्यालयास सरकारने मंजूरी दिल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभागाने माहितीच्या अधिकारात दिली आहे. या दोन वर्षांमध्ये शासनाकडे नवीन महाविद्यालयांचे तब्बल २९८ प्रस्ताव आले होते.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी गेल्या दोन शैक्षणिक वर्षांमध्ये किती नवीन महाविद्यालये व तुकडय़ांना परवानगी दिली याची माहिती मागविली होती. यावर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार शैक्षणिक वर्ष २०१४-१५ साठी एकूण १३० प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी केवळ एकाच महाविद्यालयाला मान्यता देण्यात आली. त्यानंतर उर्वरित प्रस्तावांपैकी ४६ प्रस्तावांना उद्देश पत्र देण्यात आलेले आहे. तर २०१५-१६मध्ये एकूण १६८ नवीन महाविद्यालयांचे प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाले होते.
यापैकी एकाही महाविद्यालयाला परवानगी देण्यात आलेली नाही. नवीन महाविद्यालयांसाठी सर्वाधिक १६ अर्ज औरंगाबाद येथून प्राप्त झाले होते. त्या खालोखाल बुलडाणा येथून ११ तर पुणे आणि यवतमाळ येथून प्रत्येकी ९, नाशिक येथून आठ, चंद्रपूर आणि अकोला येथून प्रत्येकी ७, मुंबईतून सहा, हिंगोली, सोलापूर, अमरावती येथून प्रत्येकी पाच, परभणी आणि गडचिरोली येथून प्रत्येकी चार, नागपूर, लातूर, जळगाव, नंदुरबार, उस्मानाबाद येथून प्रत्येकी तीन, तर सातारा, अहमदनगर, नांदेड, धुळे, कोल्हापूर, ठाणे, बीड येथून प्रत्येकी एक आणि रायगड, वसई, रत्नागिरी, बारामती सांगली येथून प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाले होते.