जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी नवीन तंत्रनिकेतन महाविद्यालय (पॉलिटेक्निक कॉलेज) सुरु करण्यास बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री एकनाथ खडसे यांचा मुक्ताईनगर हा मतगदारसंघ आहे.
मुक्ताईनगरमध्ये सुरु करण्यात येणाऱ्या तंत्रनिकेतनमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, ऑटोमोबाईल अभियांत्रिकी या पाच शाखांचा समावेश राहणार आहे. प्रत्येक शाखेत ६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यात ७० टक्के अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना व ३० टक्के सर्वसाधारण आणि राखीव प्रवर्गातून प्रवेश दिले जाणार आहेत.
या तंत्रनिकेतनसाठी १३६ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे टप्प्या-टप्प्याने भरली जाणार आहेत. तसेच मुख्य इमारत, प्रयोग शाळा, वसतीगृह, प्राचार्य व कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत. इमारतींचे बांधकाम व कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ५२ कोटी १२ लाख रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. सच्चर समितीने केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपाययोजना राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुक्ताईनगरला नवीन तंत्रनिकेतन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे.