‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’ची (एआयसीटीई) मान्यता नसलेल्या राज्यातील १५ खासगी अभियांत्रिकी पदवी व पदविका महाविद्यालयांचे प्रवेश हंगामी स्वरूपाचे असतील असे अखेर तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
या महाविद्यालयांविषयीच्या वस्तुस्थितीची माहिती विद्यार्थ्यांना दिली जावी, असा दबाव मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि प्रहार विद्यार्थी संघटनांकडून दबाव आल्यानंतर संचालनालयाने या महाविद्यालयांची यादी अभियांत्रिकीच्या अर्ज स्वीकृती केंद्रांवर देण्याचे मान्य केले आहे. या शिवाय संचालनालयाच्या संकेतस्थळावरही या महाविद्यालयांची यादी पाहता येईल.
पात्रता निकषांची पूर्तता न केल्याने एआयसीटीईने राज्यातील १९ खासगी अभियांत्रिकी पदवी व पदविका संस्थांना २०१४-१५ या शैक्षणिक वर्षांचे प्रवेश करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे, राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांकरिता ‘केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया’ (कॅप) राबविणाऱ्या तंत्रशिक्षण संचालनालयाने या संस्थांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी करून घेण्यास नकार दिला. त्यापैकी १५ महाविद्यालयांनी उच्च न्यायालयाकडून स्थगिती आदेश आणल्याने त्यांना प्रवेश करता येणार आहेत. मात्र, या १५ महाविद्यालयातील सुमारे ८००० जागांवरील प्रवेश हे हंगामी असणार आहेत.
या सगळ्याची माहिती संचालनालयाने केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना देणे आवश्यक होते. मात्र, तशी माहिती देण्यात न आल्याने विद्यार्थ्यांची फसवणूक होण्याची शक्यता होती. कारण, या प्रवेशांचा भवितव्य न्यायालयाच्या अंतिम आदेशावर अवलंबून असणार असल्याने या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे, हा एक प्रकारचा जुगार ठरू शकतो.

अण्णा हजारेंच्या पत्राची मुख्यमंत्र्यांकडून दखल
संबंधित वादग्रस्त अभियांत्रिकी महाविद्यालयांविरोधात प्रसिद्ध समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तक्रार केली होती. अण्णांच्या या पत्राची दखल घेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणात आपण व्यक्तिश: लक्ष घालू, असे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी अण्णांना लिहिलेल्या पत्रात हे आश्वासन दिले आहे.