कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांचे अन्य नजीकच्या शाळांमध्ये समायोजन करून त्या शाळा बंद करण्याचा महत्त्वपूर्ण व धोरणात्मक निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांचे वेतन आणि खर्चात सरकारची सुमारे सहा हजार कोटी रुपयांची बचत होणार असून, अर्थ खाते आणि मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केल्यावर लगेचच हा निर्णय अमलात येणार आहे. राज्यातील सर्व अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना हा निर्णय लागू होणार आहे. त्यास खासगी संस्थाचालक आणि शिक्षक संघटनांचा प्रचंड विरोध होण्याची शक्यता आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने कोणत्याही राजकीय दबावाला न जुमानता तो कसोशीने अमलात आणल्यास गेली अनेक वर्षे सुरू असलेली सरकारी तिजोरीची लूट कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हजारो शाळा बंद होण्याची शक्यता आहे.राज्यात सुमारे ८५ हजारांहून अधिक प्राथमिक व माध्यमिक शाळा असून त्यामध्ये सुमारे सव्वा कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षकांची संख्या सुमारे पाच लाख २५ हजार तर मुख्याध्यापकांची संख्या ३० हजार आहे. राज्यातील हजारो शाळांमध्ये १० आणि २० पेक्षाही कमी विद्यार्थी असताना त्या सुरू आहेत व शिक्षकांचे वेतन सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ात तर एका शाळेत एक विद्यार्थी आणि दोन शिक्षक आहेत.

निर्णय राबविण्याचे निकष..
प्राथमिक शाळा
(पहिली ते चौथी किंवा पहिली ते पाचवी)
विद्यार्थीसंख्या २० पेक्षा कमी असलेल्या प्राथमिक शाळेपासून एक किमी अंतरात अन्य शाळा उपलब्ध असल्यास सर्व विद्यार्थ्यांचे समायोजन त्यात करून शून्य विद्यार्थीसंख्या झाल्यावर शाळा बंद करण्यात येईल.
उच्च प्राथमिक शाळा (पाचवी ते सातवी किंवा सहावी ते आठवी)
विद्यार्थीसंख्या ३६ पेक्षा कमी असलेल्या उच्च प्राथमिक शाळेपासून तीन किमीच्या आत अन्य शाळा उपलब्ध असल्यास सर्व विद्यार्थ्यांचे समायोजन करून शून्य विद्यार्थीसंख्या झाल्यावर शाळा बंद केली जाईल.
माध्यमिक शाळा (नववी ते दहावी)
विद्यार्थी पटसंख्या ४०पेक्षा कमी असलेल्या शाळेपासून पाच किमीच्या आत अन्य माध्यमिक शाळा उपलब्ध असल्यास त्यात सर्व विद्यार्थ्यांचे समायोजन करून शून्य विद्यार्थीसंख्या झाल्यावर शाळा बंद करण्यात येईल.
अंमलबजावणीतील ठळक नोंदी
नजीकच्या शाळेत प्राथमिकसाठी विद्यार्थी संख्या ३० पर्यंत तर उच्च प्राथमिकसाठी ३५ पर्यंत ठेवण्यात येईल.
मात्र एक किमीच्या आत प्राथ. शाळा आणि तीन किमीच्या आत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नसल्यास समायोजनासाठी विद्यार्थीसंख्येची अट अनुक्रमे १० व १८ राहील.
शिक्षकांचे समायोजन अन्य शाळांमध्ये होईल.
कोणालाही नोकरी गमवावी लागणार नाही.