जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक पदाच्या पेपरफुटीप्रकरणी राधानगरी पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यास ५ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश रविवारी न्यायालयाने दिले. पोलिसांनी काल विस्तार अधिकारी अभिजित पाटील याला अटक केली आहे. पेपर फुटीप्रकरणी आतापर्यंत २२ जणांना अटक करण्यात आली असल्याचे तपासाधिकारी उपअधीक्षक धीरज पाटील यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवकांसह विविध विभागातील ९८ पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. आरोग्यसेविका पदाच्या पेपरवेळी एका महिला उमेदवाराकडे नक्कल आढळून आल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असता पेपर फुटीचे रॅकेट उघडकीस आले. आतापर्यंत २२ जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
या रॅकेटमधील वित्त विभागाच्या लिपिकाने पेपर राधानगरी पंचायत समितीतील विस्तार अधिकार अभिजित पाटील यांना दिला असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाल्याने शुक्रवारी त्यांना अटक करण्यात आली. आज न्यायालयाने त्यांना ५ दिवसांसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
या पेपरफुटीमध्ये आणखी कोण सामील आहे. पाटील याने कोणाला प्रश्नपत्रिका दिली याची माहिती तपासात घेतली जाणार असून आणखी काही संशयित यामध्ये सहभागी असण्याची शक्यता पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांनी दिली.