जिल्ह्याच्या राजकारणात असंतुष्ट असलेले आमदार हसन मुश्रीफ व सतेज पाटील म्हणजे छोटय़ा मनाचे मोठे उदाहरण आहेत. जिल्हा परिषदेत संख्याबळ अपुरे असतानाही त्यांनी सभापती निवडीत बाजी मारण्याची चालवलेली भाषा हेच दाखवून देत आहे, अशी खरमरीत टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केली.

जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते. येथील हॉटेल अयोध्यामध्ये झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी त्यांनी विषय समितीच्या निवडीसाठी सर्वच सदस्यांना संधी असल्याचे सांगत विविध पदांच्या आमिषांची बरसात केली.    अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत काही चालले नाही म्हणून आता विषय समिती सभापती निवडीतही हे मुश्रीफ-पाटील फोडाफोडीची भाषा करत आहेत, अशी टीका करून मंत्री पाटील म्हणाले, कोणी कसे वागावे हे आपल्या हातात नसले तरी कोण कसे वागते, यावर आपलीसुद्धा सावधानता अवलंबून असते. अशा विरोधकांना कमी लेखून चालणार नाही. ते खूप पोचलेले आहेत, मात्र आमचीही आघाडी भक्कम आहे.  सभापतिपद मिळाले नाही म्हणून नाराज होऊ नका, असा सल्ला पाटील यांनी दिला. ते म्हणाले, सभापतिपद नसले तरी जिल्हा नियोजन मंडळावर पालकमंत्री या नात्याने नवीन २९ सदस्यांच्या नियुक्त्या करावयाच्या आहेत. विषय समितीची १०३ सदस्यपदे आहेत. खेरीज एप्रिलच्या मध्यावर सभापतिपदांची संख्या वाढवण्याचा अध्यादेश निघेल. महामंडळांचीही निर्मिती होणार आहे. तरीसुद्धा प्राप्त परिस्थितीत असलेल्या पदांवर सर्व ४० सदस्यांना संधी दिली जाईल, असा आमिषांचा वर्षांवही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.

आमदार सुरेश हळवणकर यांनीही आमदार मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांना टीकेचे लक्ष्य केले.  या वेळी माजी मंत्री विनय कोरे, प्रकाश आवाडे, बाबा देसाई, समरजितसिंह घाटगे, संजय घाटगे, आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक, डॉ. सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील, व्ही. बी. पाटील, भगवान काटे यांच्यासह आघाडीचे सर्व सदस्य उपस्थित होते.