आमदार राजेश क्षीरसागर यांचा पुढाकार

औरंगाबादमध्ये पुत्राच्या शाही विवाहासाठी पाण्यासारखा पसा  खर्च होत असल्याचे राज्यातील जनता पाहत असताना कोल्हापुरातील शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुत्राच्या विवाहासाठी अवाढव्य खर्च टाळून याच खर्चाच्या रकमेतून करवीरनगरीत २५० वधू-वरांचा सामुदायिक विवाह स्वखर्चाने करण्याचा निर्णय घेतला आहे. या लग्नसराईत सामुदायिक विवाहाचे शुभमंगल करण्याचा मनोदय त्यांनी शनिवारी बोलून दाखवला.

आमदार राजेश क्षीरसागर यांचे सुपुत्र ऋतुराज आणि अशोक पटेल यांची कन्या दिशा यांचा विवाह सोहळा गुरुवारी सायंकाळी झाला. या सोहळ्याला उद्धव ठाकरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावत वधू-वरास शुभाशीर्वाद दिले. आमदार क्षीरसागर यांनी ७ वर्षांच्या आमदारकीच्या कालावधीत जोडलेला जनसमुदाय विवाहास हजर होता. त्यासाठी आवश्यक ती सोय केली होती. पण, शाही थाट जाणीवपूर्वक टाळला होता.

विवाह सोहळ्यातून काहीशी विश्रांती मिळाल्यावर आमदार  क्षीरसागर यांनी लग्नात टाळलेल्या खर्चातून सामाजिक कार्य करण्याचा संकल्प केला आहे. र्वषभर युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सतत त्यांचे सामाजिक कार्य सुरूच असते. पण, आता त्यांनी दिवंगत सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने अडीचशे वधू-वरांचा सामुदायिक विवाह स्वखर्चाने करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे नियोजन सुरू झाले असून मे-जून महिन्यात हा सोहळा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.