मुंबईतील विकसकाची खुनाची सुपारी घेतल्याप्रकरणी येथील एकास भारतीय बनावटीच्या पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसासह आज अटक केली.

स्वप्नील संतोष फातले (वय २२, रा. संग्राम चौक, इचलकरंजी ) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पिस्तूल, मोपेड आणि रोख रकमेसह सव्वालाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फातले याला न्यायालयात हजर केलं असता २९ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. शहापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मनोज कवडे यांच्या नेतृत्वाखालील पथक २५ सप्टेंबर रोजी हद्दीतील म्हसोबा मंदिर परिसरात रात्रगस्त घालत होते. गस्ती दरम्यान कमानीजवळ संशयित एक व्यक्ती उभी असल्याचे  पथकाच्या निदर्शनास आले. त्याच्याकडील विना नंबरप्लेट दुचाकी,  कागदपत्रं आणि नावाबाबत चौकशी केली असता स्वप्नील फातले असे  नाव सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता प्रवासी बॅगेत भारतीय बनावटीचे पिस्तूल आणि दोन मॅगझीन, ८ जिवंत काडतुसे, मोबाइल आणि १० हजार रुपयांची रोकड मिळून आली.  पिस्तूल, दुचाकी आणि रोख रकमेसह सुमारे सव्वालाखाचा मुद्देमाल जप्त करून त्याला अटक केली. पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी फातले याच्याकडे अधिक चौकशी केली असता पिस्तूल आणि पसे मनीष नागोरी याने दिले असून त्याने  मुंबईतील बिझलानी नामक विकसकाला संपवण्याची सुपारी घेतली असल्याचे सांगितले. या प्रकरणी फातले आणि नागोरी या दोघांवर गुन्हे दाखल केले असून नागोरी याच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना केली आहेत.  फातले आणि नागोरी याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून नागोरी याला पिस्तूल तस्करीप्रकरणी अनेक वेळा अटक झाली आहे. बिझलानी हा देखील गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित असल्याने त्याला संपवण्याची सुपारी कोणी, कोणाला आणि किती रकमेसाठी दिली याचा पोलीस तपास करत आहेत.