कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पावसाचा जोर शनिवारी कायम राहिला आहे.  दमदार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणक्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने कोदे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. आज सायंकाळपर्यंत १६ बंधाऱ्यांवर पाणी आले होते.  जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस झाल्याने कमी पाऊस पडलेल्या पूर्वेकडील भागात नदी पातळीत वाढ होऊ लागली असून खबरदारीचे उपाय योजले जात आहेत. पावसाने  इचलकरंजी शहरात गोदामाची िभत कोसळली.

जिल्ह्याच्या  पाणलोट क्षेत्रासह सर्वत्र गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या जोरदार पावसाने नद्या, धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. येथील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे. आजची पाणी पातळी २६ फूट होती. पूर येण्यासाठी आवकही दोन फूट कमी असल्याचे सांगण्यात आले. आज सायंकाळपर्यंत १६ बंधाऱ्यांवर पाणी आले होते.

कोदे धरण आज सकाळी ७ वाजता भरले. या  धरणातून ३४५ क्यूसेस विसर्ग सुरू झाला आहे. पंचगंगा नदीवरील शिरोळ – कुरुंदवाड दरम्यानचा कोल्हापूर पध्दतीचा बंधारा ओसंडून वाहत आहे. आमदार उल्हास पाटील यांनी तहसीलदार समवेत भेट देऊन नदीकाठी बॅरिकेट लावले. तसेच तेथे धोकादायक स्थितीचा इशारा फलक लावून जीवितहानी टाळण्यासाठी दक्षता घेतली. इचलकरंजी येथील असणाऱ्या महासत्ता चौक परिसरातील एम. ए. भुजनी यांच्या गोदामाची भिंत  पावसामुळे पडली. त्यामध्ये सुमारे पन्नास हजर रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले .