चित्रपट हे विश्व संस्कृती समजून घेण्याचे माध्यम आहे. विद्यार्थ्यांची दृष्टी विकसित करण्यासाठी, त्यांची विवेकी मानसिक घडण होण्यासाठी ते अतिशय प्रभावी शैक्षणिक साधन आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठातील मराठी भाषा विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजन गवस यांनी बुधवारी केले. जागतिक महिला दिनाच्या निमित्त विद्यापीठातील विदेशी भाषा विभागाचा दृष्टी उपक्रम व दक्षिणायन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

चित्रपट पाहताना माणूस दृश्य आणि त्यामागील कथन यांचा गंभीरपणे विचार करायला शिकत जातो, असा उल्लेख करून डॉ. गवस म्हणाले, समाज अत्यंत निर्मल व्हायचा असेल, तर आपली मने निर्मल व्हायला हवीत. त्यासाठी जगभरातील सशक्त, सकारात्मक आशयप्रधान चित्रपट आपल्याला मदत करतील. या जगात लोकशाही तत्त्व जपणारा, िलगभेद नाकारणारा िहसामुक्त अवकाश निर्माण करायचा असेल, तर आपण परिघाबाहेरचे, अन्यायाच्या विरोधात लढ्याची प्रेरणा देणारे परक्या भाषा व संस्कृतीचे चित्रपट पहिले पाहिजेत.

विदेशी भाषा विभागाच्या प्रमुख डॉ. मेघा पानसरे यांनी प्रास्ताविकात या चित्रपट महोत्सवाच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट केली. कोणतीही भाषा शिकत असताना त्या भाषेची संस्कृती समजून घेणे आवश्यक असते. त्यासाठी चित्रपट हे अत्यंत प्रभावी मध्यम आहे. म्हणूनच दृष्टी उपक्रमातून अनेक उत्तम दर्जाचे आशयसंपन्न चित्रपट विद्यार्थ्यांसाठी प्रदíशत केले जातात. या वर्षी समाजात विविध स्तरांवर संघर्ष करणाऱ्या महिलांच्या लढ्याची गाथा मांडली जात आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.  पहिल्या दिवशी स्मिता पाटील व नसिरुद्दीन शाह अभिनित ‘मिर्च मसाला’ या चित्रपटाचे प्रदर्शन झाले. त्यास विद्यार्थी व शिक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.