कोल्हापूरच्या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या विद्या प्रबोधिनी व निसर्गमित्र या संस्थांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला आहे . करवीर नगरीतील सामान्य जनतेच्या प्रतिसादामुळे वाढीस लागलेल्या पर्यावरण चळवळीची थेट मोदी यांनी दाखल घेतल्याने या चळवळीतील कार्यकर्त्यांना आनंदाचे भरते आले होते, तर सामान्य जनतेने, पर्यावरणप्रेमी लोकांनी सोशल मीडियाद्वारे दोन्ही संस्थांवर कौतुकाचा वर्षांव केला .

दर महिन्याला मोदी आकाशवाणीवरून मन की बात हा कार्यक्रम सादर करून समकालीन घटनांवर भाष्य करत असतात. आज त्यांनी यामध्ये आगामी गणेश उत्सवाचा उल्लेख करताना राज्यातील पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांचा संदर्भ दिला. त्यामध्ये कोल्हापूरच्या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या विद्या प्रबोधिनी व निसर्गमित्र या संस्थांच्या कार्याची दखल त्यांनी आवर्जून घेतली.

विद्या प्रबोधिनी या संस्थेने १९८८ पासून रंकाळा तलाव संवर्धनाचे काम हाती घेतले. येथे गणेश मूर्ती विसर्जति करण्याऐवजी काहिलीत विसर्जन करण्याच्या त्यांच्या आवाहनाला जनतेने प्रतिसाद दिला. उदय गायकवाड, उदय कुलकर्णी, बंडा पेडणेकर आदींनी सातत्याने केलेल्या आव्हानामुळे गणेश उत्सव पर्यावरणपूरक बनला आहे. कागदाची मूर्ती, वनस्पती रंगांचा वापर, लहान मूर्ती असे बदल झाले आहेत. निर्माल्य तलावात अजिबात टाकले जात  नाही.

निसर्गमित्र या संस्थेने १९८२ पासून पर्यावरण जागृती सुरू केली आहे. वृक्षारोपण, प्रदर्शने, फिल्म शो, कचरा व्यवस्थापन, निसर्ग शिबिर, रानभाज्यांची ओळख, पाणी वाचवू या उपक्रम, विविध आंदोलने, वृक्ष दत्तक योजना, पक्षी निवारा अशा विविध मार्गाने संस्था कार्यरत आहे. प्रा. मधुकर बाचूळकर, अनिल चौगुले, अनिल वेल्हाळ यांनी कार्याची धुरा सांभाळली आहे.